अवकाळी संकट : आंब्यांसह मोसंबी, द्राक्ष, पपई, केळी फळबागा साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 02:29 PM2020-05-12T14:29:26+5:302020-05-12T14:32:34+5:30
अनेक भागांत घेतली जाणारी उन्हाळी पिके व भाजीपाल्यालाही जबर फटका बसला.
औरंगाबाद : मराठवाड्याला शनिवारी मध्यरात्री व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात आंबा या फळपिकाला सर्वात मोठा फटका बसला. मोसंबी, चिकू, पपई, केळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. अनेक भागांत घेतली जाणारी उन्हाळी पिके व भाजीपाल्यालाही जबर फटका बसला. सोमवारी सकाळीही लातूर व उस्मानाबादच्या काही भागांत पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यात बागायती पिके साफ
परभणी: शनिवारी रात्री जिल्ह्यातील परभणी, जिंतूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरावरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनालाही या नुकसानीचा अहवाल पाठविण्याच्या सूचना जिल्हास्तरावरुन देण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे, पिंगळी कोथळा, जोड परळी आणि जिंतूर तालुक्यातील आसेगाव, दुधगाव, सोन्ना व कान्हड या ठिकाणी गारपीट झाली होती. टाकळी परिसरातील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. तसेच जोड परळी शिवारात टरबूजांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. याशिवाय काढून ठेवलेली हळद आणि कडब्याच्या वळ्यांचे नुकसान झाले.
बीडमध्ये कांद्यांचे नुकसान
बीड : जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि सौम्य गारपिटीमुळे आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून पोखरी (ता. बीड) येथील आनंद काळे या शेतकऱ्याची बैलजोडी व चिंचवण (ता. वडवणी) येथील महादेव बाबासाहेब मात्रे यांच्या मालकीचे गाय वासरु ठार झाले. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात विजेचे सिमेंट खांब मोडून पडल्याने रानमळा, अर्धमसला, भाटेपुरी, निपाणी जवळका येथील विद्युत पुरवठा खंडीत झाला. दुपारपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.
लातुरात मेघगर्जनेसह पाऊस
लातूर : जिल्ह्यात काही भागात सोमवारी पहाटे मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस झाला़ लातूर शहरात रविवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि पावसाने हजेरी लावल्याने अचानक वीजपुरवठाही खंडित झाला़ शिवाय, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, चाकूर, उदगीर, लातूर तालुक्यातील हरंगुळ बु़, पाखरसांगवी, खाडगाव, रेणापूर परिसरात रिमझिम पाऊस झाला़ शिरूर अनंतपाळ तालुक्यात काही भागात आंब्याचे नुकसान झाले आहे़
उस्मानाबादेतही पाऊस
उस्मानाबाद : जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या भागाला रविवारी व सोमवारी सकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा जोरदार फटका बसला़ परंडा, भूम, वाशी व कळंब तालुक्यात पावसाची व वादळी वाऱ्याची तीव्रता अधिक होती़ परंडा व भूम तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब तसेच डीपीही आडव्या झाल्या आहेत़ परिणामी या भागातील वीजपुरवठा सायंकाळपर्यंत खंडीत होता़ सोमवारी सकाळी उमरगा तालुक्यातील येणेगूर परिसरात काहीकाळ जोरदार पाऊस झाला आहे़ या पावसामुळे उन्हाळी पिकांचे तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने परंडा, भूम तालुक्यातील शिवारांमध्ये कांदा तसेच पालेभाज्यांचे नुकसान झाले़
हिंगोलीतही वादळी वारा
हिंगोली : जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुसाट वाऱ्यासह वसमत तालुक्यातील आडगाव रंजे, हट्टा, शिरडशहापूर व कौठा येथे पाऊस झाला. तसेच सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सेनगाव तालुक्यात कडोळी, माझोड, तपोवन, गारखेडा, गोरेगाव परिसरात पाऊस झाला़ हळद उत्पादकांना फटका बसला आहे.
नांदेड जिल्ह्यात फळपिकांचे नुकसान
नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे नांदेडसह बिलोली, नायगाव, हदगाव, माहूर, देगलूर, किनवट, लोहा, अर्धापूर या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले़ त्यामुळे शेतातील ज्वारी, मका, तीळ या पिकांचे मोठे नुकसान झाले़ शेतकऱ्यांनी वाळत टाकलेल्या हळदीचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील केळीनेही माना टाकल्या आहेत़
जालना जिल्ह्यात फळबागांना फटका
जालना : जिल्ह्याच्या बहुतांश भागात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील कोठा जहांगीर, कोळगाव, माळेगाव, घनसावंगी तालुक्यातील देवहिवरा, सागर सहकारी साखर कारखाना, तनवाडी तर बदनापूर तालुक्यातील कंडारी, उज्जैनपुरी परिसरात गारपीट झाली. या गारपिटीमुळे अनेकांच्या शेतातील उन्हाळी बाजरीसह द्राक्ष, मोसंबी, चक्कू, पपई, केळी फळबागा, आंब्याला मोठा फटका बसला. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा परिसरातील भोपळ्याची शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांच्या शेतातील शेडनेटचेही मोठे नुकसान झाले. शिवाय कांदा बिजोत्पादनाही गारपिटीचा फटका बसला आहे.