पुरस्कार वितरणाचा अवकाळी अट्टहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:06 AM2021-06-09T04:06:12+5:302021-06-09T04:06:12+5:30
औरंगाबाद : केवळ प्राथमिक शिक्षणाधिकारी सेवानिवृत्त होत असल्याचे औचित्य साधून मागील वर्षी रखडलेल्या शिक्षक पुरस्कार वितरणाचा घाट प्रशासनाने घातला ...
औरंगाबाद : केवळ प्राथमिक शिक्षणाधिकारी सेवानिवृत्त होत असल्याचे औचित्य साधून मागील वर्षी रखडलेल्या शिक्षक पुरस्कार वितरणाचा घाट प्रशासनाने घातला आहे. शिक्षणाधिकारी जैस्वाल हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून हा समारंभ १८ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जि.प. शाळांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्याची प्रथा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पुरस्कार निवड समितीने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील पुरस्कारासाठी प्राथमिक विभागातील ९ शिक्षक, माध्यमिक विभागातील ७ आणि एक विशेष शिक्षक अशा एकूण १७ शिक्षकांची निवड करण्यात आली होती. माध्यमिक शिक्षकांपैकी सोयगाव व पैठण तालुक्यातून पात्र शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले नव्हते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या यादीस विभागीय आयुक्त कार्यालयाची मंजुरीही घेतली; परंतु गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे हा पुरस्कार वितरण समारंभ रद्द करण्यात आला होता.
शिक्षणाधिकारी सूरज जैस्वाल यांच्या कार्यकाळात निवड झालेल्या या शिक्षकांना त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण व्हावे, अशी पदाधिकारी व प्रशासनाची इच्छा आहे. त्यानुसार ते ३० जून रोजी निवृत्त होत असल्यामुळे १८ जून रोजी पुरस्कार वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
चौकट..........
पुरस्काराचे मानकरी शिक्षक असे
यासंदर्भात शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांमधून योगिता मोरे (शेंद्राबन जि.प. शाळा, औरंगाबाद), वैशाली जाधव (बाभूळगाव जि.प. शाळा, फुलंब्री), सुनील वानखेडे (घाटनांद्रा जि.प. शाळा, सिल्लोड), उमेश महालपुरे (बनोटी जि.प. शाळा, सोयगाव), भिकन वनारसे (अंधानेर जि.प. शाळा, कन्नड), आबाजी सोनवणे (नेवरगाव जि.प. शाळा, गंगापूर), मनोजकुमार सोनवणे (सुदामवाडी जि.प. शाळा, वैजापूर), अशोक विघ्ने (पळसगाव जि.प. शाळा, खुलताबाद), अशोक पाटील (तारुपिंपळवाडी जि.प. शाळा, पैठण) आदी.
माध्यमिक विभागातून मोहम्मद फहिम (सातारा, औरंगाबाद), शैलजा नाईकवाडे (गणोरी, फुलंब्री), बबन सोनवणे (शिवना, सिल्लोड), अशोक वसावे (चिकलठाण, कन्नड), शिवकुमार जैस्वाल (वाळूज, गंगापूर), दत्तात्रय जाधव (कसाबखेडा, खुलताबाद), मनिषा कुमावत (खंडाळा, वैजापूर) आणि विशेष शिक्षक पुरस्कारासाठी कल्याण सोनवणे (फुलंब्री) आदींची निवड करण्यात आली आहे.