केवळ मनुष्यबळाअभावी सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील २१ आयसीयू बेड विनावापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 06:02 PM2020-09-11T18:02:12+5:302020-09-11T18:05:45+5:30
घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी ५० आयसीयू बेडची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.
औरंगाबाद : शहरात आयसीयू बेड शिल्लक नसल्याने रुग्ण एकीकडे एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात भटकंती करीत होते, त्याच वेळी दुसरीकडे घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील ५० पैकी तब्बल २१ आयसीयू बेड केवळ मनुष्यबळाअभावी वापराविना होते. काही कर्मचाऱ्यांच्या जोरावर या खाटा गुरुवारी रुग्णसेवेत दाखल करण्यात आल्या; परंतु पुरेशा मनुष्यबळाअभावी तारेवरची कसरत घाटीला करावी लागणार आहे.
घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी ५० आयसीयू बेडची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्यक्षात यातील २९ बेडच रुग्णसेवेत दाखल झाल्या; परंतु केवळ मनुष्यबळाअभावी २१ बेड रुग्णसेवेत दाखल करता आल्या नाहीत. शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण चारपट झाले आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आयसीयू बेडची गरज असताना एकाही रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नव्हते. घाटीत आयसीयू बेड उपलब्ध होते; परंतु मनुष्यबळच नसल्याने या खाटा रुग्णांसाठी वापरताच येत नव्हत्या.
शहरातील वाढती रुग्णसंख्या, घाटीत रुग्णांचा वाढता ओघ, ही परिस्थिती पाहून २१ आयसीयू बेड गुरुवारी दुपारी रुग्णसेवेत दाखल करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. यासाठी ३० परिचारिका, पीजीची परीक्षा दिलेले काही डॉक्टर उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी कोरोनाच्या रुग्णांसाठी ७८ आयसीयू बेड होते. त्यांची संख्या आता २१ ने वाढेल, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले.
सुपर स्पेशालिटी ब्लॉकची परिस्थिती
सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये २१८
खाटा या कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या २१८ खाटांसाठी किमान १०० चतुर्थश्रेणी कर्मचारी, १५० परिचारिका, ५० निवासी डॉक्टर पाहिजेत; परंतु आजघडीला केवळ ४५ चतुर्थश्रेणी कर्मचारी, ११० परिचारिका आणि ३६ निवासी डॉक्टर आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावरच कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराची कसरत घाटी प्रशासनाला करावी लागत आहे.
घाटीत केवळ १५ ‘ओटू’, ८ ‘आयसीयू’ बेड शिल्लक
घाटी रुग्णालयात गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ १५ आॅक्सिजन बेड आणि ८ आयसीयू बेड शिल्लक होते. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने घाटी रुग्णालय पूर्ण भरून गेले आहे. तरीही कोणत्याच रुग्णास खाट उपलब्ध नसल्याचे कारण सांगून परत पाठवू नये, अशी सक्त सूचना घाटी प्रशासनाने डॉक्टरांना केली आहे. घाटीत कोरोनाच्या रुग्णांसाठी ४५८ खाटा आहेत, तर ७८ आयसीयू बेड आहेत. यात १५ आॅक्सिजन बेड आणि ८ आयसीयू बेड रिकामे होते. रुग्णांचा ओघ पाहता रात्रीतून या खाटाही भरून जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली. घाटीत दुपारपर्यंत तब्बल २२४ रुग्ण गंभीर अवस्थेत होते.
अपघात विभागातच रुग्ण
कोरोनाचे संशयित रुग्ण अपघात विभागात दाखल झाल्यानंतर याठिकाणी अँटिजन टेस्ट करून निदान केले जात आहे. उपलब्ध खाटांची माहिती घेण्यात काहीसा वेळ जातो. त्यामुळे अनेक रुग्णांना येथून वॉर्डात दाखल होण्यास उशीर होतो. रुग्ण अपघात विभागात थांबले तरी तेथे आॅक्सिजनची व्यवस्था असल्याने गैरसोय होत नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.