सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तिसऱ्यांदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:03 AM2021-02-16T04:03:26+5:302021-02-16T04:03:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरात लाखो रुपये खर्च करून शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात लाखो रुपये खर्च करून शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा दोन वर्षांपूर्वीच उभारण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च करून संपूर्ण तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
यापूर्वीही दोनदा वेगवेगळ्या कारणांनी कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे, यासाठी शहरातील शिवसेना नेते आग्रही आहेत.
शहागंज चमन भागात सरदार वल्लभभाई पटेल यांचा अर्धाकृती पुतळा होता. याठिकाणी नवा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा निर्णय महापालिकेने पाच-सहा वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार पुतळ्याचे काम पूर्णही झाले परंतु चबुतऱ्याचे सुशोभिकरण झाले नसल्याने तसेच येथील स्वच्छतागृहाच्या स्ट्रक्चरमुळे पुतळ्याचे अनावरण वारंवार लांबणीवर पडले. सुशोभिकरणाचे काम अर्धवट असल्याचे कारण देत सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणारा अनावरणाचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. चंद्रकांत खैरे यांनी अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाचा नाईलाज झाला.
एका रात्रीत लाखोंचा खर्च
महापालिकेने एका रात्रीत याठिकाणी सुशोभिकरण केले. परंतु, कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. यापूर्वीही कार्यक्रम पत्रिकेत चंद्रकांत खैरे यांचे नाव नसल्याने अनावरण कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.