अजिंठा-वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण
By संतोष हिरेमठ | Published: November 28, 2023 12:06 PM2023-11-28T12:06:03+5:302023-11-28T12:08:04+5:30
जगभरातील ४० पेक्षा अधिक चित्रपटांची मेजवानी; अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाच्या अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या नवव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण व वेबसाइटचे पुनर्प्रदर्शन सोमवारी एमजीएम विद्यापीठाच्या व्ही. शांताराम सभागृहात झाले. हा महोत्सव ३ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान होणार असून, यात ४०पेक्षा अधिक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संस्थापक नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख सल्लागार अंकुशराव कदम, एमजीएमचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, नीलेश राऊत, डॉ.प्रवीण सूर्यवंशी, डॉ. अपर्णा कक्कड, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी, डॉ. आनंद निकाळजे,प्रा. शिव कदम आदी उपस्थित होते.
नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत आणि मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा-वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत आहे. एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स या महोत्सवाचे अकॅडमिक पार्टनर आहेत.
निवडक चित्रपटांचे ट्रेलर्स
महोत्सवाचे दिग्दर्शक अशोक राणे यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीमार्फत उपस्थितांशी संवाद साधला. नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनीही यावेळी विचार मांडले. कार्यक्रमात निवडक चित्रपटांचे ट्रेलर्स दाखविण्यात आले.