गोरगरिबांच्या उपचारातून घाटी रुग्णालयात महिन्याला १.७० कोटींपर्यंत जमा, रुग्ण किती येतात?
By संतोष हिरेमठ | Published: April 11, 2024 07:21 PM2024-04-11T19:21:51+5:302024-04-11T19:29:17+5:30
एकूण जमा रक्कमेच्या २५ टक्के रक्कम शासनाला, तर ७५ टक्के रक्कम घाटी रुग्णालयातच खर्च
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांना आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयाला उपचारापोटी महिन्याकाठी १.५० ते १.७० कोटी रुपये मिळतात. ही रक्कम रुग्णांच्या खिशातून नाही, तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून घाटीला मिळत आहे. यातील २५ टक्के रक्कम शासनाला जाते, तर ७५ टक्के रक्कम घाटीतच खर्च केली जात आहे.
घाटीत मोफत उपचार मिळतात, हे रुग्णांना माहीत आहे. परंतु, हे मोफत उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दिले जातात. योजनेत उपचार केल्यानंतर दाव्याची रक्कम घाटीला अदा केली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. योजनेंतर्गत घाटी रुग्णालयासह निवडक आजारांवर खाजगी अंगीकृत रुग्णालयांत पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थ्यांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत.
घाटीत महिन्याला किती रुग्ण?
मराठवाड्यासह जवळपास १२ जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. घाटीतील ओपीडीत महिन्याकाठी सुमारे ४० हजार रुग्ण तपासले जातात.
२५ टक्के शासनाला
घाटी रुग्णालयात १,१७७ खाटा आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक रुग्ण दाखल असतात. त्यामुळे जमिनीवर गादी टाकूनही रुग्णांवर उपचार करावे लागतात. महिनाभरात ५ हजारांवर रुग्ण आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल होतात. या ‘आयपीडी’तील रुग्णांवर योजनेच्या माध्यमातून उपचार केले जातात. यातून महिन्याकाठी १.७० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम घाटीला मिळते. यातील २५ टक्के शासनाला जाते. ७५ टक्के रक्कम ही रुग्णसेवा प्रोत्साहन भत्ता, औषधी, मनुष्यबळ इ.वर खर्च केला जातोय.
योजनेतील रुग्णसंख्या वाढविणार
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांच्या दाव्यांतून घाटीला महिन्याला जवळपास १.७० कोटींची रक्कम मिळते. ही रक्कम वाढीसाठी योजनेत उपचार होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता