...आता एका दिवसात दाेन पीएचडी प्रबंधांची भर; नामविस्तारानंतर विद्यापीठाचा उंचावला आलेख
By योगेश पायघन | Published: January 14, 2023 07:08 PM2023-01-14T19:08:09+5:302023-01-14T19:08:59+5:30
महाविद्यालये, विद्यार्थी, विभाग, सुविधा दुपटीने तर संशोधन वाढले तिपटीने
- योगेश पायघन
औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा विस्तार होऊन २८ वर्षे सरले. या काळात विद्यापीठाने शैक्षणिक, संशोधनासह पायाभूत सुविधांत मैलाचा दगड गाठून देशातील शंभर विद्यापीठांच्या यादीत स्थान पटकावले आहे. नामविस्तारापूर्वी मराठवाड्यातील २३५ संलग्न महाविद्यालये २८ विभाग, २.५ लाख विद्यार्थी असलेलेल्या विद्यापीठात आज ४८५ महाविद्यालयांसह ५६ विभागातून साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा आलेख दुपटीने उंचावलेला असताना कौशल्य, गुणवत्तेसह संशोधनाची कास विद्यापीठाने धरली आहे.
नामविस्ताराच्या पॅकेजमध्ये विद्यापीठाला संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र विभाग मिळाले. त्याशिवाय कुलगुरू डाॅ. नागनाथ कोतापल्ले यांच्या कार्यकाळात तब्बल १० विभाग सुरू झाले. नामविस्तारापूर्वी विद्यापीठात महात्मा फुले प्रतिष्ठान हे एकच अध्यासन केंद्र होते, त्यांची संख्या आज १८ वर पोहाेचली आहे. विद्यापीठ परिसरात ४६ तर २००४ मध्ये उस्मानाबाद उपपरिसर सुरू होऊन तिथे आज १० विभागातून विद्यार्थी शिकत आहेत. मुलींचे तीन आणि मुलांच्या चार वसतिगृहात केवळ सातशे विद्यार्थी क्षमता आज १७ पर्यंत पोहाेचली असून मुलींचे आठ तर मुलांचे सात वसतिगृह उभी आहेत. आणखी काही वसतिगृह नियोजित आहेत. नामविस्तारावेळी मुख्य प्रशासकीय इमारतीतूनच सर्व कारभार चालायचा. त्यानंतर स्वतंत्र परीक्षा भवन, विभागांना स्वायत्तता, काैशल्य विकास केंद्र, डिजिटल स्टुडीओ उभारण्यात आले. नाट्यगृह, सिफार्ट सभागृह उभारल्या गेले. ३३ व्या दीक्षांत समारंभानंतर नामविस्तार झाला. विद्यापीठाचा नुकताच ६१ वा दीक्षांत समारंभ पार पडला. नामविस्तारानंतर पदे विभागली गेली होती. २००८ मध्ये विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. २००९ मध्ये नवा आकृतिबंधानुसार २५९ शिक्षक आणि ७९९ शिक्षकेतर कर्मचारी मिळाले. नामविस्तारावर पाच जणांची पीएचडी, नामविस्ताराबाबत तीन ऑडिओ बुक्स तर १५ लेख विद्यापीठाच्या संग्रहात आहे.
पूर्वी दाेन दिवसांत एक, आता दिवसांत दाेन पीएच.डी.
नामविस्तारापर्यंत मध्यवर्ती ग्रंथालयात पीएच.डी.चे शोधप्रबंध १,४०२ तर पुस्तके दाेन लाख ८६ हजार ३१३ होते. नामविस्तारानंतर ग्रंथालयाचे ज्ञानस्राेत केंद्र बनले. या काळात आजपर्यंत ४,८४८ शोधप्रबंध, एक लाख दाेन हजार २४० पुस्तकांची भर पडली. १९९४ नंतर सरासरी दरवर्षी १७३ पीएच.डी.ची भर पडली. त्यातही आता वर्षाकाठी ७०० पीएच.डी. संशोधने होत आहेत. २८ वर्षानंतर आता दिवसाकाठी दोन पीएच.डी.च्या शोधप्रबंधांची भर पडते आहे. ज्ञानस्रोत केंद्र पुस्तकांनी आणि ऐतिहासिक ठेव्याने समृद्ध बनताना डिजिटलयाझेशनमध्ये राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे ठरले आहे. इ.स. १४०० ते १७०० दरम्यानच्या दुर्मीळ ३,४१४ हस्तलिखीत पोथ्या, ९२ शिलालेखांचे ठसे, त्यात मराठी १८ शिलालेख, ३९ सनदचा ठेवा ज्ञानस्रोत केंद्रात असल्याचे संचालक डाॅ. धर्मराज वीर यांनी सांगितले.
परिसराचा झाला विकास
१४२ एकरावर फळबाग लागवड करण्यात आली. चिंच १,५३०, आवळा ९४५, सिताफळ ३,०००, चिकू ४१५, आंबा १,३२५ अशी एकूण ७,२१५ फळझाडे आहेत. तर १,७०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून विद्यापीठ उद्यान विभाग याची देखरेख करते. विद्यापीठात बजाज इन्क्युबेशन सेंटर, मुख्य प्रशासकीय इमारत, इतिहास वास्तूसंग्रहालय, पर्यावरणशास्त्र विभाग, परीक्षा भवन, कुलगुरू निवासस्थान, ह्युमॅनिटी इमारत, ग्रंथालय, लंच होम परिसरात अशी १० उद्याने फुलवण्यात आली आहेत. तर बाॅटनिकल गार्डन पुन्हा कात टाकत असल्याचे किशोर निर्मळ यांनी सांगितले.
संशोधन, गुणवत्तेची कास धरून वाटचाल
नामविस्तारानंतर शैक्षणिक, संशोधन, प्रशासनाने गुणवत्तेची कास धरून विद्यापीठाने वाटचाल केली आहे. नवे कोर्स, रिसर्च ग्रॅण्ट, महाविद्यालयांना प्रोत्साहन देत आहेत. ऑनलाइन मूल्यांकन, कुलगुरू संवाद, विदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासह, विदेशी विद्यापीठांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता, भाैतिक सुविधा वाढीवर भर देत आहोत.
- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद