आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:48 AM2024-08-26T11:48:59+5:302024-08-26T11:49:46+5:30
सर्व उद्योग गुजरातला पाठविणाऱ्या भाजपचे राजकारण महाराष्ट्र विरोधी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला
छत्रपती संभाजीनगर : संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला देशातील जनतेने २४० वर रोखले. महाराष्ट्रात त्यांनी संविधान चिरडले आहे, यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही संविधानासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई असेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रविवारी शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उशीर झाल्याने थेट आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, राज्यात आता कोणीही खुश नाही. शेतकरी नाराज आहे, तरुणांना रोजगार नाही. मात्र, काहींना ७२ व्या मजल्यावर फ्लॅट मिळाला, तर कोणाला टोल नाके मिळाले आहे. गद्दारांची दोन वर्षांत जशी प्रगती झाली तशी राज्याची प्रगती झाली नसल्याचे आदित्य यांनी नमूद केले.
भाजपचे राजकारण राज्यविरोधी
भाजपचे राजकारण महाराष्ट्र विरोधी असल्याचा आरोप करीत आदित्य म्हणाले की, हे सर्व उद्योग त्यांनी गुजरातला पाठविले. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणाऱ्या मर्सिडिज बेंज कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने धाड मारली. कशासाठी मारली धाड, काय कारवाई केले याचे उत्तर द्यावे लागेल असेही ठाकरे म्हणाले.
चार जेसीबी आणि क्रेन लावून स्वागत
आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी एका क्रेनवर मोठा हार लावण्यात आला होता. तसेच चार जेसीबीमधून फुलांची उधळण त्यांच्यावर करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.