UPSC Results : टेलरच्या नातवाची कमाल; सर्वस्व पणाला लावून शेवटच्या अटेंप्टमध्ये बाजी मारली!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:04 PM2020-08-04T20:04:52+5:302020-08-04T20:09:11+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून २१४ वा रँक प्राप्त केला आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या सीमेलगत असलेल्या शेंद्रा कमांगर येथील एका सर्वसामान्य टेलरचा नातू अथक परिश्रम घेऊन नागरी सेवेच्या (यूपीएससी) सर्वोच्च परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करतो, ही बाब त्याच्या कुटुंबियालाच नव्हे तर नव्या पिढीसाठीही आदर्शवत आहे.
जि.प. शिक्षण विभागातील वरिष्ठ विस्तार अधिकारी राजेश महाजन यांचे चिरंजीव सुमीत महाजन याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून २१४ वा रँक प्राप्त केला आहे. सुमीतचे वडील राजेश महाजन यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यांचे वडील गावात टेलरींंगचे काम करायचे. त्यांनी आपल्या हालाखीच्या परिस्थितीही राजेश यांना शिक्षण दिले. ते आज फुलंब्री येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राजेश महाजन यांनीही आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाला चांगले संस्कार व शिक्षण दिले.
सुमीतने स.भु. महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतील व्हीजेएनटी महाविद्यालयात बी.टेक.(प्रॉडक्शन) पदवीचे शिक्षण २०१३ साली पूर्ण केले. प्रशासकीय सेवेचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले. अन्य नोकरी न करता यूपीएससीच्या माध्यमातून नागरी सेवेत करिअर करण्याचा त्याने निर्धार केला. कोणतेही क्लासेस न लावता पुण्यात राहून सुमीतने या परीक्षेचा अभ्यास केला. काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. तो तीनवेळा मुलाखतीपर्यंत पोहोचला, पण यश सतत हुलकावणी देत होते. तरीही खचून न जाता त्याने ही परीक्षा पुन्हा पुन्हा दिली. अखेर सहाव्या व शेवटच्या अटेंप्टमध्ये त्याला यश आले. सुमीतच्या या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
सातत्य आणि जिद्दीने हमखास यश मिळते
सुमीत महाजन म्हणाला की, मी दिवसातून सात- आठ तास अभ्यास करायचो. परंतु, अभ्यास किती तास करावा, याला माझ्या मते जास्त महत्त्व नाही. तो नेमका करावा. यातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने टेक्स सिरीजचा अभ्यास करावा. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासातील सातत्य आणि जिद्द महत्त्वाची आहे.दोन मिनिटात काय करतोय