उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:11 PM2019-06-20T14:11:17+5:302019-06-20T14:14:29+5:30

मराठीतून लिहिली कायदेविषयक पुस्तके

Urdu-language lawyer taking efforts for conservation of Marathi | उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन 

उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन 

googlenewsNext
ठळक मुद्देइंग्रजी भाषेतील पुस्तकांचा मराठीतून अनुवाद 

- स. सो. खंडाळकर  

औरंगाबाद : उर्दू भाषिक असूनही शहरातील एका वकिलाने मराठीत एकूण चौदा पुस्तके लिहून मराठीच्या संवर्धनासाठी मोठा हातभार लावला आहे. अ‍ॅड. नवाब पटेल असे या वकिलाचे नाव असून, मराठीबरोबरच त्यांनी उर्दूतून अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. 

अ‍ॅड. नवाब पटेल हे मूळचे उर्दू भाषिक. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण उर्दू भाषेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण मात्र मराठी माध्यमातून झाले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी भाषेत झाले. अ‍ॅड. पटेल यांनी  बी.ए.एलएल.बी., बीजे, एम.एम.सीजे. केले आहे.  मराठी भाषेतून पुस्तक लिहिण्यामागील उद्देशाबद्दल सांगताना पटेल म्हणाले, देशातून इंग्रजी राजवट गेली. पण देशात सर्व कायदे इंग्रजी भाषेत केले जातात. दुसरीकडे इंग्रजी सर्वांना येतेच असे नाही. बहुतांश मंडळी इंग्रजी वाचू- लिहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून जनतेला कायद्याच्या ज्ञानापासून वंचित राहावे लागते. याचा विचार करून इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा मराठी अनुवाद अगदी साध्या, सोप्या व सरळ भाषेत केला आहे. एका अर्थाने माझ्या हातून मराठीच्या संवर्धनाचेच कार्य घडले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये. 

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५, लोकपाल व लोकायुक्त कायदा-२०१३, वक्फ कायदा २००५, सन २०१३ च्या सुधारणेसह, वक्फ नियम २००५ सन २०१४ च्या नियमांसह, मुस्लिम वारसा हक्क कायदा, कायदेशीर तलाख, शरियत कायद्याच्या तरतुदीसह, बालविवाह प्रतिबंध कायदा-२००६, अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा-१९८९, स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन विरोधी कायदा १९८६, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम -२०१२, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा-२०१३, भारतीय पारपत्र अधिनियम-१९६७, मानसिक आरोग्य अधिनियम १९८७, अल्संख्याक समाजाच्या व्यक्तींसाठी राज्यघटना व फौजदारी  कायद्यामधील विशेष तरतुदी, ही अ‍ॅड. नवाब पटेल यांची मराठी भाषेतून लिहिलेली अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके आहेत. 

महत्वाची पुस्तके केली प्रकाशित 
मूळचे उर्दू भाषिक असलेल्या नवाब पटेल यांनी सर्वसामान्य मुस्लिम बंधू-भगिनींसाठी उर्दू भाषेतही महत्त्वाच्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती अशी : वक्फ कानून २००५, कानून बराए विरासत, घरेलू तशददूदसे खवातिन की हिफाजत कानून-२००५, चेक बाऊन्स हुआ तो क्या करे, वक्फ नियम २००५, या त्यांच्या पुस्तकांनाही चांगली मागणी आहे. अ‍ॅड. नवाब पटेल हे पत्रकारितेचे पदव्युत्तर असल्याने ‘असा गेला आठवडा’ हे मराठीतील साप्ताहिकही चालवतात. मराठीच्या संवर्धनासाठी ते करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते पटेल पती-पत्नीचा सत्कारही करण्यात आला होता.

Web Title: Urdu-language lawyer taking efforts for conservation of Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.