बीएस-६ डिझेल वाहनांत इंधनासह लिक्विड युरियाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:49 PM2020-03-12T23:49:53+5:302020-03-12T23:52:01+5:30
आरटीओ : बीएस-४ वाहने नोंदणीसाठी ३१ मार्चची ‘डेडलाईन'
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात १ एप्रिलपासून बीएस-४ वाहनांची कोणत्याप्रकारे नोंदणी केली जाणार नाही. अशा वाहनांची वाहनमालकांनी ३१ मार्चपूर्वी नोंदणी करून नंबर घ्यावा लागेल. त्याबरोबरच बीएस-६ डिझेल वाहनांमध्ये डिझेलसह प्रदूषण कमी होण्यासाठी युरिया लिक्विड टाकावे लागणार आहे, अशी माहिती गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सहायक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांची उपस्थिती होती. सर्वाेच्च न्यायालयाने देशभरात १ एप्रिलनंतर बीएस-६ मानांकन नसलेली वाहने विक्री व नोंदणी करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बीएस-४ वाहन खरेदी केल्यानंतर त्याची ३१ मार्चपूर्वी नोंदणी होऊन क्रमांक जारी होणे आवश्यक आहे. सध्या बाजारात बीएस- ४ ची वाहनांची संख्या कमी आहे. वाणिज्यिक वाहने आणि दुचाकी वाहने काही प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असाव्यात अशी शंका आहे. बीएस-४ वाहनांची नोंदणी होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवार, रविवारी कार्यालय सुरु राहणार असल्याचे मेत्रेवार यांनी सांगितले. सध्या ९० टक्के वाहने बीएस-६ ची आलेली असल्याचे खराडे यांनी सांगितले.
या वाहनांना सवलत
बीएस ४ च्या निर्णयातून बीएस-३ मानांकन असलेल्या ट्रॅक्टर आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाºया वाहनांना सुट देण्यात आली आहे. या वाहनांची विक्री ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर यात बीएस-४ वाहने येतील, असे आरटीओ अधिकाºयांनी सांगितले.
१०० लिटरला लागेल ५ लिटर लिक्विड
बीएस-६ डिझेल वाहनांना १०० लिटर इंधनासाठी ५ लिटर युरिया लिक्विड टाकावे लागेल. यासाठी वेगळी टाकी राहिल. यामुळे सायलन्सरमधून निघणारा धूर फिल्टर होण्यास मदत होईल. पेट्रोल पंपांवर जवळपास ४० ते ५० रुपये लिटर या दराने लिक्विड उपलब्ध होईल, असे संजय मेत्रेवार यांनी सांगितले.