पाणी जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पाणीपातळीत मोठी घट

By साहेबराव हिवराळे | Published: April 3, 2024 06:23 PM2024-04-03T18:23:30+5:302024-04-03T18:23:53+5:30

जलसाक्षर व्हा : शहरात ज्यांंनीही बोअरवेल पुनर्भरण केलेले आहे, त्यांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळते.

Use water sparingly; Big drop in water level in the district including Chhatrapati Sambhajinagar city | पाणी जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पाणीपातळीत मोठी घट

पाणी जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पाणीपातळीत मोठी घट

छत्रपती संभाजीनगर : रखरखत्या उन्हात नद्या-नाले व तसेच पाणथळ कोरड्या होत आहेत. शहरात सिमेंटचे जंगल वाढल्याने बोअरवेलनेही तळ गाठला आहे. केवळ पाच मिनिटेही बोअरवेल चालणे अवघड आहे. आता जलसाक्षर होण्याची व बोअरवेल पुनर्भरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मालमत्ताधारकांकडून मनपा प्रशासनाने घरांच्या बांधकाम परवान्यातच बोअरवेल पुनर्भरणाची एक अट टाकावी, जेणेकरून जलसाक्षर होणे गरजेचे आहे. नळाला तोट्या लावणे, पावसाळ्यात घराच्या छतावरील पाणी वाहून न जाऊ देता ते बोअरवेलमध्ये जिरविणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि ऐन हिवाळ्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. शहरात ज्यांंनीही बोअरवेल पुनर्भरण केलेले आहे, त्यांना उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळते. परंतु घर आणि दार आणि अंगणातही सिमेंटचा गिलावाच शहरवासीयांनी घालण्याचा सपाटा लावला असल्याने जमिनीत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण होत नसेल तर पाणीपातळी वाढणार कशी, असा सवाल आहे.

मार्च २०२४ची पाणीपातळी घट मीटरमध्ये पुढीलप्रमाणे :
छत्रपती संभाजीनगर- ०.४८, गंगापूर- १.१६, कन्नड - ०.५२, पैठण- १.००, सिल्लोड- १.५४, सोयगाव- १.०७, वैजापूर- २.८४, खुलताबाद- २.८६, फुलंब्री- १.७४ घट झाल्याचे निदर्शनास येते.

घर तिथं बोअर, पुनर्भरणाचा संकल्प करा
शहरात जमिनीत पाणी साठविण्याऐवजी उपसाच सुरू आहे. हजारो बोअरवेल मोडल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केलेला दिसतो. घेतलेले बोअरवेल तळ गाठत असेल तर पुनर्भरणाचा संकल्प करणे गरजेचे आहे.
-डॉ. प्रशांत अवसरमल

जलसाक्षर होणे गरजेचे
पाणीपातळी वाढविण्यासाठी आपणही छोटे-छोटे उपाय करू शकतो. पाण्याचे महत्त्व जनतेला पटवून देणे गरजेचे आहे. घरामध्ये विनाकारण तोटी फिरवून ते पाणी वाया घालवण्यापेक्षा ते वाचविण्यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत.
-जीवन बेडवाल, वरिष्ठ भूवैज्ञानिक

Web Title: Use water sparingly; Big drop in water level in the district including Chhatrapati Sambhajinagar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.