हायफाय लग्नात पाहुणे म्हणून वावर, संधी साधत ३६ लाखांचे दागिने घेऊन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 06:40 PM2021-12-07T18:40:50+5:302021-12-07T18:42:17+5:30
Crime In Aurangabad : चोरटे दोन किंवा तीन असून ते दागिने असलेली बॅग घेऊन कारने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे.
औरंगाबाद: हळदीच्या सांस्कृतीक कार्यक्रमातून चोरट्यांनी ३६ लाख ५० हजारांच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान बीडबायपासवरील सूर्यालॉन्स येथे घडली. चोरटे दोन किंवा तीन असून ते दागिने असलेली बॅग घेऊन कारने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे.
या प्रकरणी मंगळवारी पहाटे चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास गात यांनी दिलेली माहिती अशी की, नागपूर येथील सुनिल जैस्वाल कुटुंबातील विवाह समारंभा सूर्यालॉन्स येथे आला होता. सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने केवळ २५ टक्के पाहुणे उपस्थितीत होते. हळदीपूर्व फक्त सोन्याचा हार पिशवीतून काढून त्यांनी सुनेला दाखविला आणि पिशवी तेथे बाजूला ठेवून दिली. कार्यक्रम सुरू असताना कुणाचेही लक्ष नव्हते. परंतु साडेनऊच्या सुमारास पिशवी दिसत नसल्याचे जैस्वाल यांच्या निदर्शनास आले. तेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासणी, हॉलमध्ये सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.
सीसीटीव्हीमध्ये लहान मुलगा दिसला
चोरी करणारे दोघेतिघे असण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लहान मुलगा सोन्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन पळताना दिसतो. त्याच्या पाठोपाठ दोघेही येथून निघून जातात. त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून चोरटे लॉन्सच्या बाहेर जाताना दिसत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए.के. रगडे करीत आहेत.