मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणे चंद्रकांत खैरेंना महागात

By राम शिनगारे | Published: October 9, 2022 09:44 PM2022-10-09T21:44:47+5:302022-10-09T21:44:56+5:30

सातारा ठाण्यात गुन्हा दाखल : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची तक्रार

Using slurs against the Chief Minister cost Chandrakant Khaire | मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणे चंद्रकांत खैरेंना महागात

मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणे चंद्रकांत खैरेंना महागात

googlenewsNext

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरणे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. ठाकरे गटाचे शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रखर भाषेत टीका केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय शनिवारी रात्री घेतला. या निर्णयाविषयी रविवारी सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून ‘लटकवून मारले असते’ असा शब्दप्रयोग केला. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांना अनेकदा बोके, चोर, रिक्षावाला असे शब्द वापरले. प्रसिद्धी माध्यमातून असंवैधानिक भाषेचा वापर करणे, दंगल घडविण्याच्या दृष्टीने दोन गटांत भांडणे लावणे, त्यासाठी नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणे आणि त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणे असे बेकायदेशीर वर्तन खैरे नेहमीच करतात. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते, असे सातारा ठाण्यात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या नेहमीच्याच विधानांमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे खैरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणीही जंजाळ यांनी केली. त्यानुसार खैरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ ए (१) (बी), १८९ आणि ५०५, १(बी) यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी सहायक निरीक्षक सुनील कऱ्हाळे अधिक तपास करीत आहेत.

काय आहेत कलमे ?

१५३ ए (१) (बी) : या कलमानुसार वादग्रस्त बोलून दोन गटांत तणाव निर्माण करणे, चिथावणी देणे हा गुन्हा आहे. या कलमानुसार जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
१८९ : या कलमानुसार लोकसेवकाबद्दल अपशब्द वापरणे, धमकी देणे गुन्हा आहे. या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

५०५, १(बी) : या कलमानुसार एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन, प्रतिमा हनन करणे गुन्हा आहे. या गुन्ह्यातही दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

Web Title: Using slurs against the Chief Minister cost Chandrakant Khaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.