अभिषेकच्या द्विशतकाने उस्मानाबाद भक्कम स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:31 AM2018-05-25T00:31:56+5:302018-05-25T00:32:39+5:30
अभिषेक पवार याच्या स्फोटक द्विशतकी खेळीच्या बळावर उस्मानाबाद संघाने गुरुवारी नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत लातूरविरुद्ध आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या दिवसअखेर लातूर संघाने २९ धावांत ३ फलंदाज गमावले असून ते ३८७ धावांनी पिछाडीवर आहेत.
औरंगाबाद : अभिषेक पवार याच्या स्फोटक द्विशतकी खेळीच्या बळावर उस्मानाबाद संघाने गुरुवारी नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत लातूरविरुद्ध आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या दिवसअखेर लातूर संघाने २९ धावांत ३ फलंदाज गमावले असून ते ३८७ धावांनी पिछाडीवर आहेत.
उस्मानाबादचा कर्णधार अभिषेक पवार याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथमेश पाटील आणि यश लोमटे यांनी सलामीसाठी ४१ धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात केली. त्यानंतर लौकिक सूर्यवंशी आणि यश लोमटे यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक पवारने चौफेर टोलेबाजी करताना लातूरच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्याने अंकित गणेश याच्या साथीने ८८, गिरीश बोचरेला बरोबर घेत ९७ चेंडूंत आक्रमक ९४ धावांची भागीदारी केली. अभिषेकने सौरभ बिराजदार याच्या साथीने ४४ चेंडूंत ६० धावांची भागीदारी करताना उस्मानाबादची स्थिती भक्कम केली. अभिषेक पवार याने त्याच्या आक्रमक खेळीत स्वरूप बैनगिरे याला २, तर आकाश आडे, कार्तिक गोविंदपूरकर आणि यश बारगे यांना प्रत्येकी १ असा मिडविकेट आणि लाँगआॅनच्या दिशेने असे एकूण ६ उत्तुंग षटकार ठोकले. त्याच्या या स्फोटक खेळीने उस्मानाबादने पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला. गत वर्षी १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवणाºया अभिषेक पवारने अर्धशतक ५१ चेंडूंत, शतक १०२ चेंडूंत, दीडशतक १३६ चेंडूंत आणि द्विशतक अवघ्या १७१ चेंडूंत फटकावले. अभिषेक पवारने उस्मानाबादतर्फे सर्वाधिक १७२ चेंडूंत २८ सनसनीत चौकार आणि ६ षटकारांसह २०३ धावांची खेळी सजवली. यश लोमटेने ११ चौकारांसह ८८ चेंडूंत ५०, अंकित गणेशने ३१, गिरीश बोचरे व लौकिक सूर्यवंशी यांनी प्रत्येकी २८, तर सौरभ बिराजदारने १९ व प्रथमेश पाटीलने १७ धावांचे योगदान दिले. लातूरकडून दौलत पाटील याने ५० धावांत ४ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात लातूरची सुरुवात खराब होऊन त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज २९ धावांत तंबूत परतले. उस्मानाबादकडून प्रथमेश पाटीलने २ व सौरभ बिराजदारने १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
उस्मानाबाद (पहिला डाव) : ८ बाद ४१६ धावा (घोषित) (अभिषेक पवार २०३, यश लोमटे ५०, अंकित गणेश ३१, लौकिक सूर्यवंशी २८, गिरीश बोचरे २८. दौलत पाटील ४/५०). लातूर : पहिला डाव ३ बाद २९. (प्रथमेश पाटील २/९, सौरभ बिराजदार १/०५).