विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत ‘उत्कर्ष’ने पुन्हा मारली बाजी, विकास मंचचा धुव्वा
By योगेश पायघन | Published: November 30, 2022 06:57 PM2022-11-30T18:57:17+5:302022-11-30T18:59:17+5:30
१० पैकी ९ जागांवर ‘उत्कर्ष’चा विजय, सलग ४५ तास चालली मतमोजणी
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटातील निवडणुकीची मतमोजणी तब्बल ४५ तासांनी पुर्ण झाली.सोमवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली मोजणी बुधवारी सकाळी ७ वाजता संपली. पदविधर गटातील १० पैकी तब्बल ९ जागांवर मोठ्या फरकाने उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारत विद्यापीठ विकास मंचचा धुव्वा उडविला. बुधवारी पहाटे उत्कर्षचे भारत खैरनार, हरिदास सोमवंशी, तर विद्यापीठ विकास मंचच्या योगिता होके पाटील या एकमेव उमेदवार विजयी झाल्या.
पदवीधर गटातील सर्व दहाही जागांचे निकाल बुधवारी सकाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने जाहीर झाले. विजयी उमेदवारांचे निकाल कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी जाहीर केले. तर विजयी उमेदवारांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. साखळे यांच्यासह निवडणुक समिती, तज्ज्ञ, अधिष्ठातांची उपस्थितीत मतमोजणीसाठी प्रत्येक शिफ्टला ४० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण १२० जणांनी हि प्रक्रीया पार पाडली.
सतीश चव्हाणांची खेळी यशस्वी
पहिल्या टप्प्यात राखीव गटातून उत्कर्षचे सुनील मगरे, सुनील निकम, राऊत किशनराव, पूनम पाटील व दत्तात्रय भांगे हे मोठ्या फरकाने निवडून आले. तर खुल्या प्रवर्गातील ४ जागांवर उत्कर्षचे उमेदवार विजयी झाल्याने पदवीधर मतदार संघात आ. सतीश चव्हाण यांनी पुन्हा निर्वीवाद वर्चस्व सिद्ध केले. विद्यापीठ विकास मंचच्या एकमेव विजयी जागेसाठी उत्कर्षच्या गोटातूनच मदत झाल्याची चर्चा मंचच्या गोटातून सुरू होती. त्यामुळे योगिता होके पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता.
दोघांनी कोटा ओलांडला, तिघे काठावरच पास
खुल्या गटासाठी झालेल्या १८ हजार ४०० मतातून १६ हजार ४७२ मते वैध तर १,९६८ मते अवैध ठरली. पहिल्या पसंतीच्या फेरीत एकही उमेदवार २ हजार ७४६ हा विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करु शकले नाहीत. डॉ. नरेंद्र काळे हे बाराव्या तर जहुर शेख हे १८ व्या फेरीत कोटा पूर्ण करुन विजयी झाले. भारत खैरनार २६७६, योगिता होके पाटील २१७३ व हरिदास सोमवंशी हे १७२७ मते घेऊन विजय ठरले. हे तीनही उमेदवार कोटा पूर्ण करु शकले नाहीत. मतमोजणीच्या २४ व्या फेरीनंतर पहिल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.
पहिल्या फेरीत हजाराच्या आत
संभाजी भोसले ९५७, रमेश भूतेकर ८९०, लक्ष्मण नवले ७१९, विजय पवार ७२१, अशिष नावंदर ४६५, तुकाराम सराफ ४४८ , प्रकाश इंगळे ४०१, चंद्रकांत चव्हाण ३५६, अमर कदम २३६, पंकज बनसोडे २८७, सुनील जाधव २०१, सुनील गावीत १२६, भागवत निकम ११८, पंडित तुपे १०२, परमेश्वर वाघमारे ९९, हनुमंत गुट्टे ९४, अमोल शिंगटे ८५, पकंज बनसोडे २२७ , सुनील काळे ३७, सतीश धुपे ३१, सुचिता इंगळे २९, नितीन फंदे २१, अनिल तडवी १५, विलास सरकटे ९ अशा एकुण २५ उमेदवारांना हजार मतेही पहिल्या फेरीत मिळवता आले नाही.
मतदार नोंदणी ते निकाल या सर्व टप्प्यांवर कर्मचारी, प्राध्यापक, उमेदवार, प्रशासन, पोलीसांच्या सहकार्यामुळे पारदर्शक व निर्विवादपणे शांततेत मतदान, मतमोजणी पार पडली. दुसऱ्या टप्प्यातही ही प्रक्रिया अशाच पद्धतीने पार पाडू. मतदानाचे प्रमाण वाढवणे व बाद मतांचे प्रमाण घटवणे आव्हान असेल.
-डॉ.प्रमोद येवले, कुलगुरु, डाॅ. बा. आं. म. वि. औरंगाबाद
२ दोन दशकांपासून विद्यापीठाच्या शैक्षणिक, भौतिक विकासात विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने नेहमीच पुढाकार घेतला. याचीच पावती म्हणून सुजान मतदारांनी दिली.अधिसभेच्या १० पैकी ९ जागांवर विद्यापीठ उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना विजयी केले. उत्कर्ष पॅनल यापुढेही विकासासाठी प्रभावीपणे कार्य करेल. मतदारांचे आभार.
-आ. सतीश चव्हाण, उत्कर्ष पॅनलचे प्रमुख