विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची रंगत वाढली, उत्कर्षकडून महाविकास आघाडीचा प्रयत्न
By योगेश पायघन | Published: November 17, 2022 07:41 PM2022-11-17T19:41:04+5:302022-11-17T19:42:33+5:30
युवासेनेच्या तिघांचा समावेश, खुल्या प्रवर्गात ५ जागांसाठी ९ उमेदवार
औरंगाबाद-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटाची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होत आहे. या निवडणूकीत युवासेनेच्या शिवशाही पॅनलची मागणी मान्य झाली. युवासेनेच्या ३ उमेदवारांना विद्यापीठ उत्कर्ष पॅनलमध्ये स्थान देवून उत्कर्षकडून ‘महाविकास आघाडी’चा प्रयत्न झाला आहे. बामुक्टो संघटनेसोबतही उत्कर्षची चर्चा सुरू आहे.
पॅनलचे निमंत्रक डॉ.शिवाजी मदन म्हणाले, शिवसना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी गुरूवारी उत्कर्ष पॅनलचे सर्वेसर्वा आमदार सतीश चव्हाण यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी ऋषीकेश खैरे, दत्ता भांगे, हनुमान शिंदे आदींची उपस्थिती होती. चर्चेअंती विद्यापीठ उत्कर्ष पॅनलमध्ये खुल्या प्रवर्गातून शिवशाही पॅनलचे तुकाराम सराफ, अमोल शिंगटे यांना तर महिला प्रवर्गातून पुनम पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने खुला आणि महिला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील उमेदवार यापूर्वीच जाहीर केले होते. आता महिला प्रवर्गातून आता पाटील पुनम तर खुल्या प्रगर्वातून नरेंद्र काळे, विजय पवार, हरिदास सोमवंशी, शेख जहूर, खैरनार भारत, भुतेकर रमेश, संभाजी भोसले हे सात आणि सराफ, शिंगटे युवासेनेचे दोन असे ९ उमेदवार पाच जागांसाठी विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे अधिकृत उमेदवार असतील.