उत्तरा नक्षत्रास प्रारंभ, संजीवनी बेट बहरले; दाेन वर्षानंतर पर्यटक, रुग्णांची बेटावर गर्दी
By हरी मोकाशे | Published: September 16, 2022 05:34 PM2022-09-16T17:34:02+5:302022-09-16T17:34:26+5:30
या बेटावर विविध वनऔषधी असल्याने दरवर्षी राज्याबरोबरच परराज्यातून संजीवनी प्रेमींसह रुग्ण, वैद्य, हकीम, आयुर्वेदाचार्य, पर्यटक गर्दी करतात.
लातूर : कोविडच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू राहिल्याने गेल्या दोन वर्षांत येथील संजीवनी बेटावर पर्यटक, रुग्णांची संख्या रोडावली होती. मात्र, यंदा पर्यटकांसह रुग्णांची गर्दी होत आहे. त्यामुळे हे बेट पर्यटकांनी फुलल्याचे पहावयास मिळत आहे.
चाकूर तालुक्यातील वडवळ ना. येथील संजीवनी बेटावर उत्तरा नक्षत्रात यात्रा भरते. बुधवारपासून सुरुवात झाली असून २७ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या बेटावर विविध वनऔषधी असल्याने दरवर्षी राज्याबरोबरच परराज्यातून संजीवनी प्रेमींसह रुग्ण, वैद्य, हकीम, आयुर्वेदाचार्य, पर्यटक गर्दी करतात. कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत ही संख्या रोडावली होती. मात्र, यंदा गर्दी होत असून दिवसेंदिवस ती वाढत आहे. तसेच शाळांच्या सहलींबरोबरच येथील वनस्पतींवर संशोधन करणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
संजीवनी बेट विकासापासून दूरच...
संजीवनी बेटास पर्यटनाचा 'क' दर्जा आहे. ऐतिहासिक पर्यटन केंद्र व्हावे म्हणून मागणी होत आहे. येथे दुर्मिळ वनौषधी असल्याने उत्तरा नक्षत्रात गर्दी असते. येथे दुर्मिळ वनौषधींवर प्रक्रिया करणारे केंद्र व्हावे, रसशाळा, पंचकर्माचे युनिट, आयुर्वेद काॅलेज व्हावे अशी मागणी आहे. शासनाने लक्ष न दिल्याने बेट विकासापासून कोसोदूर आहे. येथील बेटावरील वनस्पतींच्या सेवनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील शेकडो रूग्ण येतात. येथील वनस्पती, मातीचे आयुर्वेद तज्ज्ञांनी परीक्षण केले आहे. बेटावरील माती लालसर असून लोहाचे प्रमाण ३३ टक्के आहे. हा भाग समुद्र सपाटीपासून एक हजार फूट उंचीवर आहे. त्यामुळे येथील हवा शुद्ध असल्याने वनस्पती गुणकारी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
बेटावर या दुर्मिळ वनस्पती...
राजहंस, निर्मळी, शंखपुष्पी, काळी टाकळी, आडसुळा, गुळवेल, शतावरी, जटाशंकर, अनंतमुळ, सर्पगंधा, सफेद मुसळी, कवच बीज, कोरफड, रानमिरची, भुईकोहळा, पाषाणकंद, मदनफळ, लोखंडी खडक, शेपू अशा दुर्मिळ वनस्पती आहेत. या वनस्पतींचे संवर्धन, संरक्षण आणि संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच कायमस्वरूपी पाण्याची सोयही आवश्यक आहे.
तीन दिवस मुक्काम...
येथे येणारा रुग्ण हा तीन दिवस राहतो. वनस्पतींचे सेवन करुन तिसऱ्या दिवशी उतारा म्हणून काळ्या साळीचा भात व गाईचे तूप सेवन करुन गावी परतात. दरम्यान, दुर्मिळ वनौषधींचा अनावश्यक वापर होऊ नये. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.