दिवसभरात ३ हजार ८५७ जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:04 AM2021-05-12T04:04:07+5:302021-05-12T04:04:07+5:30
औरंगाबाद : शासनाकडून मुबलक लस डोस (मात्रा) उपलब्ध होत नसल्याने बुधवारी शहरात ३ हजार ८५७ नागरिकांनाच डोस देता आले. ...
औरंगाबाद : शासनाकडून मुबलक लस डोस (मात्रा) उपलब्ध होत नसल्याने बुधवारी शहरात ३ हजार ८५७ नागरिकांनाच डोस देता आले. दुपारनंतर महापालिकेची सर्व केंद्रे लसीअभावी बंद ठेवावी लागली. रात्री उशिरा महापालिकेला ९ हजार डोस प्राप्त होणार आहेत. त्यामुळे बुधवारी शहरात ६१ ठिकाणी लस देण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र हे डोस फक्त दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांसाठी आहेत.
महापालिकेला रविवारी रात्री १३ हजार डोस मिळाले होते. सोमवारी १० हजार नागरिकांना डोस देण्यात आले. मंगळवारी ३ हजार ३ नागरिकांना डोस दिले. १८ ते ४४ वयोगटातील ८४९ जणांना लस देण्यात आली. महापालिकेकडील लसीचा साठा मंगळवारी संपला. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना देण्यासाठी महापालिकेकडे डोसच उपलब्ध नाही. रात्री उशिरा महापालिका प्रशासनाला ९ हजार डोस प्राप्त होणार आहेत. त्यामुळे बुधवारी शहरात ६१ वेगवेगळ्या केंद्रांवर फक्त दुसरा डोस देण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सहा केंद्रांवर लस देण्यात येईल. त्यासाठी नागरिकांना एक दिवस अगोदर कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. एका केंद्रावर फक्त दोनशे नागरिकांना डोस देण्याची व्यवस्था आहे.