सिल्लोड-सोयगावात पहिल्याच दिवशी २३ हजार जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:19+5:302021-09-03T04:04:19+5:30
सिल्लोड : दोन दिवसीय जम्बो कोरोना लसीकरण अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अभियानाच्या पहिल्याच ...
सिल्लोड : दोन दिवसीय जम्बो कोरोना लसीकरण अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अभियानाच्या पहिल्याच दिवशी सुमारे २३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणावेळी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरूणांपासून ते नव्वद वर्षापर्यंतच्या ज्येष्ठांना लस देण्यात आली.
नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ झाला. या वेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, जि.प. सीईओ नीलेश गटणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील आदींची उपस्थिती होती.
---
१५ दिवसात शंभर टक्के लसीकरण
बजाज ग्रुपने कोरोनाच्या संकटात या अभियानासाठी ५० हजार कोरोना लस दिली. लसीकरण मोहिमेसाठी आणखी ८० हजार लस बजाजकडून उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी.पी. त्रिपाठी यांनी या वेळी दिली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस हा एकमेेव उपाय आहे. येत्या १५ दिवसांत सिल्लोड, सोयगाव तालुक्यात शंभर टक्के लसीकरण केले जाईल, असे सत्तार म्हणाले.
---
सोयगावात आठ हजार नागरिकांचे लसीकरण
सोयगाव तालुक्यात आयोजित जम्बो कोविड लसीकरण मोहिमेत ५४ केंद्रांवर आठ हजार २३८ जणांचे लसीकरण झाले आहे, असे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील काही केंद्रांवर आरोग्य पथक उशिरा पोहोचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती, तर काही केंद्रावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
सकाळच्या सत्रात काही केंद्रांवर लसीकरण संथगतीने सुरू होते. परंतु दुपारनंतर नागरिकांनी केंद्रावर गर्दी केल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातून देखील काही लोक लसीकरणासाठी आले होते, परंतु स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात आले. मोहीम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी डी. एस. अहिरे, गोरखनाथ सुरे, शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे, अनिल पवार यांनी परिश्रम घेतले.
---
कन्नड, फुलंब्रीचे आरोग्य पथक बोलावले
सोयगाव तालुक्यातील घोसला, रवळा, निंबायती. बहुलखेडा येथे लसीकरण पथक उशिरा पोहोचले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, तहसीलदार जसवंत यांनी तातडीने जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधत ऐनवेळी कन्नड आणि फुलंब्री तालुक्यातील आरोग्य पथकाची मदत घेतली. अनेक गावांतील लसीकरण केंद्रांवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी सांगीतले.
020921\img-20210902-wa0222.jpg
क्याप्शन
सिल्लोड शहरात एका बुथवर ९० वर्षीय वृद्ध इसमाने लस घेतली..त्यांच्या सोबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर व आरोग्य कर्मचारी अधिकारी दिसत आहे.
2) लसीकरण मोहिमेचे उदघाटन केल्यावर मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार समोर जमलेले नागरिक अधिकारी दिसत आहे