औरंगाबाद विभागात ५० टक्के बालकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:54 PM2018-12-18T22:54:44+5:302018-12-18T22:55:57+5:30
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाखांहून अधिक उद्दिष्ट महिनाअखेरीस गाठले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
औरंगाबाद : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाखांहून अधिक उद्दिष्ट महिनाअखेरीस गाठले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडून २७ नोव्हेंबरपासून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना शासकीय, खासगी शाळा, अंगणवाडी आणि शासकीय रुग्णालयांत गोवर-रुबेला लसीकरण केले जात आहे. भारतात गोवरमुळे दरवर्षी ५० हजार बालकांना जीव गमवावा लागतो, तर रुबेला विषाणूमुळे वारंवार गर्भपात, मेलेले मूल जन्माला येतात. १ लाख मुलांत १५० मुले गतिमंद अथवा आजारांना बळी पडतात. ९० टक्के मुलांना गोवरची बाधा होते. यामध्ये ताप येतो, अंगावर पुरळ उठतात. साधारण ८ दिवसांत गोवर बरा होतो; परंतु अनेक महिने पुरळाचे डाग शरीरावर दिसतात.
चार जिल्ह्यांत लसीकरण
लसीकरण मोहिमेत जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बालकांना लसीकरण केले जात आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत आतापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक बालकांचे लसीकरण झाल्याची माहिती डॉ. लाळे यांनी दिली.