स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी औरंगाबादेत पाच ठिकाणी लसीकरण
By मुजीब देवणीकर | Published: September 13, 2022 02:24 PM2022-09-13T14:24:03+5:302022-09-13T14:24:23+5:30
गरोदर महिला, मधुमेही, रक्तदाब रुग्णांना मोफत लस
औरंगाबाद : स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरात पाच रुग्णालये, आरोग्य केंद्रात मोफत ऐच्छिक लसीकरणाची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी संबंधित रुग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे सोमवारी (१२ सप्टेंबर) करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा धनवाले यांनी याबाबत माहिती दिली. स्वाइन फ्लू आजाराचे लसीकरण चार महिन्यांच्या गरोदर माता, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत आहे. महापालिकेचे सिडको एन-८ येथील रुग्णालय, एन-११ येथील रुग्णालय, बन्सीलालनगर रुग्णालय, कैसर कॉलनी रुग्णालय या पाच ठिकाणी मोफत लसीकरण केले जाणार आहे.
ऑगस्ट महिन्यात औरंगाबादमध्ये स्वाइन फ्लू आजाराचे ५४ रुग्ण आढळून आले. त्यातील २९ रुग्ण शहरी भागातील व २० रुग्ण औरंगाबाद ग्रामीण भागातील होते. दोन रुग्ण जालना जिल्ह्यातील तर, तीन रुग्ण इतर जिल्ह्यांतील होते, असे डॉ. धनवाले यांनी स्पष्ट केले. ताप येणे, घसा दुखणे, नाक गळणे, अतिसार, उलट्या, अंगदुखी, डोकेदुखी, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.