अभूतपूर्व उत्साहात लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:03 AM2021-01-17T04:03:56+5:302021-01-17T04:03:56+5:30

-- औरंगाबाद : प्रवेशद्वारावर फुलांची आरास, रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांची सजावट, बाजूलाच सेल्फी पाॅइंट, परिसर स्वच्छतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेली ...

Vaccination begins with unprecedented enthusiasm | अभूतपूर्व उत्साहात लसीकरणाला सुरुवात

अभूतपूर्व उत्साहात लसीकरणाला सुरुवात

googlenewsNext

--

औरंगाबाद : प्रवेशद्वारावर फुलांची आरास, रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांची सजावट, बाजूलाच सेल्फी पाॅइंट, परिसर स्वच्छतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत शुक्रवारी बन्सीलालनगर, सादातनगर, भीमनगर, सिडको एन ११ आणि सिडको एन आठ येथील आरोग्य केंद्रांवर दिसून आली. सकाळी ६ वाजेपासून तयारीत लागल्याने थकलेल्या कर्मचाऱ्यांचा उत्साह सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होता. कोरोनाविरुद्धच्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्याचा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

बन्सीलालनगर येथे पहिली लस बालरोगतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र वैद्य यांना शनिवारी सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी टोचली गेली. पालकमंत्री सुभाष देसाई, खा. डाॅ. भागवत कराड, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाड‌‌ळकर यांच्या उपस्थितीत जयश्री खरात यांनी ही लस डाॅ. वैद्य यांना टोचली. त्यानंतर उर्वरित लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा शुभारंभ झाल्याचा निरोप पाठवून तेथील लसीकरणही सुरू करण्यात आले.

--

आधी वाद, नंतर उत्साह

---

सकाळी १०.३० वाजता खा. भागवत कराड, आ. अतुल सावे यांनी लसीकरण मोहिमेचे निमंत्रण देण्यावरून डाॅ. पाडळकर यांना तर पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था, लसीकरण जनजागृतीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यातच पत्रकार आणि जिल्हाधिकारी यांच्या वाद निर्माण झाला. तर माध्यम प्रतिनिधींनी या प्रकाराबद्दल पालकमंत्री देसाई यांच्याकडेही नाराजी व्यक्त केली. खैरे यांनीही यात मध्यस्थी करत वाद मिटवला. त्या मानापमान नाट्याच्या गोंधळातच पहिले लसीकरण झाले. मात्र, त्यानंतर एकच उत्साह आरोग्य केंद्रात पहायला मिळाला.

---

लाभार्थींचे गुलाब पुष्पांनी स्वागत

--

आधी कागदपत्रांची पडताळणी, तपासणी व त्यानंतर लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील पहिल्या लसीकरणाचा मान मिळालेले डाॅ. राजेंद्र वैद्य, डाॅ. प्रशांत जाधव, डाॅ. रश्मी बोरीकर, डाॅ. प्रदीप गुजराथी, डाॅ. रुता बोरगावकर, डॉ. किशोर पारगावकर आदींसह लस घेतलेल्या खासगी डाॅक्टर लाभार्थींचा गुलाब पुष्प देत डाॅ. स्मिता नळगीरकर, डाॅ. अर्चना राणे, डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ. रश्मी मयुरे आदींनी सत्कार करत तब्येतीची विचारपूस केली.

---

प्रत्येक बूथवर १२० डोसचे वितरण

--

बन्सीलालनगर येथे लसीकरणासाठी आवश्यक आयएलआर शीतगृह असल्याने २० हजार डोसेस येथे ठेवण्यात आले होते. त्यातून शुक्रवारी सकाळी ७ वाजता सादातनगर, भीमनगर, सिडको एन ११ आणि सिडको एन आठ येथील केंद्रावर प्रत्येकी १२० डोस पाठवण्यात आले. तर १२० डोस ९ वाजता बन्सीलालनगर केंद्रावर काढण्यात आले. सकाळी ६ वाजेपासून २५ कर्मचारी सजावट आणि लसीकरणाच्या तयारीत लागलेले होते, असे शीतसाखळी अधिकारी डाॅ. उज्ज्वला भामरे यांनी सांगितले.

---

पडेगाव परिचऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या

१८ विद्यार्थिनी लस घ्यायला आल्या नाहीत

--

भीमनगर : आरोग्य केंद्र येथे दुपारी २ वाजेपर्यंत केवळ ८ लसीकरण झाले होते. दुपारच्या भोजनानंतर लसीकरणासाठी गर्दी जमलेली होती. पडेगाव परिचऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या १८ विद्यार्थिनी ज्या पहिल्या १०० मध्ये होत्या त्या येणार नसल्याचे सांगत उर्वरित लाभार्थींना फोन लावून बोलावणे सुरू असल्याचे डाॅ. सुहासिनी पाटील यांनी सांगितले. आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर येथील लाभार्थी होते. या केंद्रावर योगीता ढालवाले, दिनेश मस्के, शेख इमरान, पंढरीनाथ मानवतकर, गणेश वसमतकर नियोजन पाहत होते.

---

महिलेला आली ग्लानी

---

सिडको एन ८ : येथील केंद्राच्या प्रमुख डॉ. बुशरा सिम्मी यांच्यासह खासगी डाॅक्टर, आयएमएचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना या केंद्रावर लसीचा पहिला डोस देण्यात आला. एसएमएस गेले नाही म्हणून फोन करून लाभार्थींना बोलवण्यात येत होते. काहीजण येऊ न शकल्याने शंभरच्या पुढच्या काही डाॅक्टरांनी येथे बोलवून लस देण्यात आली, तर सकाळी एका महिलेला ग्लानी आली होती; परंतु थोड्या विश्रांतीनंतर त्या महिला घरी परतल्या.

---

लसीकरणासाठी लागली रीघ

---

सादातनगर : आरोग्य केंद्राच्या लसीकरण बूथवर खासगी डाॅक्टर, आशा सेविका, आरोग्य सेवक, सेविका यांच्यासह कमलनयन बजाज रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी रीघ लागली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तार शेख, शोएब शेख, डाॅ. संतोष टेंगले, डाॅ. शेख अन्वर, उर्मीला नव्हाडे लसीकरणाची जबाबदारी संभाळत होते.

---

सजावट आणि स्वच्छतेकडे लक्ष

---

सिडको एन ११ : मनपाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. बाळकृष्ण राठोडकर, बालरोगतज्ज्ञ डाॅ. रवी सावरे, डाॅ. पल्लवी हिवराळे, डाॅ. समीर खान, डाॅ. विशाल ठाकरे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांना या केंद्रावर लसीकरण करण्यात आले. सजावट आणि स्वच्छतेची विशेष काळजी येथे घेतलेली दिसून आली. कोणालाही साईड इफेक्ट दिसून आली नसल्याचे डाॅ. सावरे यांनी सांगितले,

---

आरोग्य केंद्र : पहिले लाभार्थी : लस टोचक एएनएम : वेळ

बन्सीलालनगर : डाॅ. राजेंद्र वैद्य : जयश्री खरात : ११.२२ वा.

सादातनगर : डाॅ. दीपक मसलेकर : अस्मा शेख : १२.१२ वा.

भीमनगर : डाॅ. सुहासीनी पाटील : वर्षा जाधव : ११.३० वा.

सिडको एन ८ : डाॅ. मेघा जोगदंड : सरोज राठोड : ११.३० वा.

सिडको एन ११ : डाॅ. संध्या कोंडपल्ले : वंदना साळवे : ११.३४ वा.

Web Title: Vaccination begins with unprecedented enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.