१८ वर्षांवरील नागरिकांना लस, आजपासून कोविन ॲपवर नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:05 AM2021-04-28T04:05:02+5:302021-04-28T04:05:02+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारपासून कोविन ...
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारपासून कोविन ॲपवर नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, शासनाच्या कोट्यातून या नागरिकांना लस देण्याबद्दल कोणतेही निर्देश जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त झालेले नाहीत. हे निर्देश प्राप्त न झाल्यास संबंधिताना लसीकरणासाठी खासगी दवाखान्यात जावे लागण्याची शक्यता आहे.
राज्यात १ मेपासून १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटाच्या सर्वांचे लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंगळवारी बैठक झाली. बैठकीत लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. डी.एम.पाटील यांनी मार्गदर्शन केले. या व्हिसीमध्ये देण्यात आलेल्या सूचनांची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. त्या म्हणाल्या की, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या लशींच्या साठ्यातून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना अद्याप महापालिकेला प्राप्त झालेल्या नाहीत; मात्र बुधवारपासून या नागरिकांना लसीकरणासाठी आपली नोंदणी करता येईल. खासगी दवाखान्यांनी लस स्वत: खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत शासनाकडून मार्गदर्शक सूचना न आल्यास १८ वर्षांवरील नागरिकांना खासगी दवाखान्यात जाऊन लस घ्यावी लागू शकते, असे त्यांनी सूचित केले. शासनाच्या लसींच्या कोट्यातून हेल्थवर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लसीचा दुसरा डोस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.