आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:04 AM2021-05-01T04:04:26+5:302021-05-01T04:04:26+5:30
औरंगाबाद : राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीकरणाचा शुभारंभ महाराष्ट्र ...
औरंगाबाद : राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीकरणाचा शुभारंभ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात तीन केंद्रांवर दुपारी २ ते ५ यावेळेत लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस दिली जाणार आहे.
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर टाकण्यात आली. सध्या ४४ आणि त्यावरच्या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा मोफत पुरवठा केला जात आहे. १ मेपासूनच्या मोहिमेत राज्य सरकारांनी लस विकत घेऊन ती नागरिकांना (लाभार्थींना) पुरवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय २८ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयानुसार १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरू केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सात हजार लसींचा पुरवठा शासनाकडून करण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या लसींच्या साठ्यातून जिल्ह्यातील मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) आणि खुलताबाद येथील लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे. औरंगाबाद शहरात मुकुंदवाडी येथील महापालिकेचे आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी येथील पालिकेचे आरोग्य केंद्र आणि सादातनगर आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी लसीकरण केले जाईल. प्रत्येक केंद्रावर शंभर लाभार्थींना लस दिली जाईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.