कोरोनामुक्तीसाठी लस ठरतेय मोठी अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:04 AM2021-04-24T04:04:16+5:302021-04-24T04:04:16+5:30
औरंगाबाद : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरी भागात महापालिका प्रशासनाने योग्य वेळी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. ...
औरंगाबाद : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरी भागात महापालिका प्रशासनाने योग्य वेळी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. संक्रमण रोखण्यात लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिकेने व्यापक लसीकरण मोहीम सुरू केली. शासनाकडून साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात आतापर्यंत दोन लाख नागरिकांना लस देण्यात आली. शुक्रवारी दुपारी अचानक लस संपल्यामुळे मोहीम थांबवावी लागली.
केंद्र शासनाने ३० एप्रिलपर्यंत ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे निर्देश दिले. शहरात ११५ वॉर्डांमध्ये १४० टीम खास लसीकरणासाठी नेमण्यात आल्या. लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज सहा ते सात हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेकडे असलेला लसचा साठा अचानक संपला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने दररोज दहा हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. शहरात ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या पाच लाख एवढी आहे. आतापर्यंत २ लाख लस मनपाला देण्यात आल्या. त्या शुक्रवारी संपल्या. प्रशासनाला ८० पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे दुपारनंतर बंद करावी लागली. आरोग्य क्षेत्रातील जाणकार मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सध्या लस हेच एक प्रभावी शस्त्र आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण वरदान ठरेल. शासन आदेशानुसार आता महापालिका प्रशासनाने अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येकाला लस देण्याचे नियोजन केले आहे. दहा लाख नागरिकांना लस द्यावी लागणार आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या पाच लाख नागरिकांना अद्याप पूर्ण लस मिळालेली नाही. अशा परिस्थितीत नवीन उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. १,२०० वरून रुग्णसंख्या ५०० पर्यंत आली. मृत्यूदरही नियंत्रणात आहे. कोरोनाचा मुकाबला करताना जिल्हा प्रशासनासह पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा होत असताना राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पालकमंत्री सुभाष देसाई हेसुद्धा लस तुटवडा प्रकरणात लक्ष घालू शकतात.
कोट...
लवकरच लस उपलब्ध होईल
लसीकरण मोहीम राबविण्यासाठी महापालिकेकडून साठा सध्या संपलेला आहे. आम्हाला लवकरच लसचा साठा उपलब्ध होईल. त्यानंतर आम्ही पुन्हा नव्या जोमाने लसीकरण मोहीम सुरू करणार आहोत.
-आस्तिककुमार पाण्डेय, मनपा प्रशासक