मनपाच्या पाच आरोग्य केंद्रांवर आज लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:04 AM2021-01-16T04:04:42+5:302021-01-16T04:04:42+5:30
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेला कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. ...
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेला कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर याप्रमाणे पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईलद्वारे केंद्राचे नाव, वेळ याची माहिती पाठविण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रांवर सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आरोग्य विभागाचे अधिकारीदेखील यावेळी असणार आहेत. महापालिकेच्या भीमनगर, सिडको एन-११, सादातनगर, सिल्कमिल कॉलनी, बन्सीलालनगर या आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. महापालिकेची लसीकरणासाठी संपूर्ण तयारी झाली असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
५०० लस केंद्रांवर पाठविणार
मनपाला वीस हजार कोविशिल्ड लसीचे डोस मिळालेले आहेत. त्यातील ५०० डोस लसीकरणासाठी दिले जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर शनिवारी सकाळीच कोविशिल्ड लसीचे बॉक्स पाठविले जातील. एका बॉटलमध्ये पाच मिली लसीची मात्रा असून त्यातून दहा जणांचे देण्याचे नियोजन करण्यात आले असेल तरी त्यातील दहा टक्के मात्रा वाया जाणार असल्याने नऊ जणांना लसीची मात्रा देण्यात येईल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लसीकरण केले जाणार आहे.