नोंदणी असेल तरच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:06 AM2021-01-08T04:06:58+5:302021-01-08T04:06:58+5:30
औरंगाबाद : कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली ...
औरंगाबाद : कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. लस घेण्यासाठी मनपाकडे ८ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.
कोरोना लसीकरण मोहीम चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीयसह खासगी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोना लसीच्या दोन मात्रा देण्यात येणार आहेत. त्याकरिता शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या नियंत्रण कक्षात नाव नोंदणी केली जात आहे. नाव नोंदणी करून अॅपवर ही माहिती डाऊनलोड केली जाणार आहे. अॅपवरूनच संबंधितांना लस घेण्यासाठी तारीख, वेळ आणि केंद्र याबद्दलची माहिती कळविण्यात येणार आहे. महापालिकेकडे आतापर्यंत १२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी झालेली आहे. नोंदणी झालेल्या निम्म्या कर्मचाऱ्यांची अपूर्ण माहिती प्राप्त झालेली आहे. या कर्मचाऱ्यांनी पत्ता, मोबाईल नंबर, पॅनकार्ड नंबर याची माहिती दिलेली नाही. ही माहिती मिळविण्यासाठी मनपाच्या नियंत्रण कक्षातून वारंवार संबंधित रुग्णालयास संपर्क साधला जात असला तरी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ८ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली नाही, त्यांना कोरोना लस दिली जाणार नाही, असेही सुत्रांनी सांगितले.