लसीकरणाचे सर्व्हर दीड तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:02 AM2021-07-31T04:02:16+5:302021-07-31T04:02:16+5:30
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा माेठ्या प्रमाणात तुटवडा असताना गुरुवारी पहाटे महापालिकेला १७ हजार ४०० डोसचा साठा मिळाला. शुक्रवारी ...
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा माेठ्या प्रमाणात तुटवडा असताना गुरुवारी पहाटे महापालिकेला १७ हजार ४०० डोसचा साठा मिळाला. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील आरोग्य केंद्रांवर लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागल्या आणि अचानक दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सर्व्हर बंद पडले. त्यामुळे लस घेणाऱ्यांची नोंदणी करणे अशक्य झाले. तब्बल दीड तासानंतर सर्व्हर पुन्हा सुरू झाले. सायंकाळपर्यंत अनेक लसीकरण केंद्रांवर मोठ्या रांगा दिसत होत्या.
शहरातील अपुऱ्या लसींच्या साठ्यासंदर्भात ‘लोकमत’ने मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रकाश टाकला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून शहराला मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचा विचार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील ३९ केंद्रांवर कोविशिल्ड, तर ३ केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे लसीकरण सुरू केले. पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांना समान प्रमाणात कोटा ठरवून देण्यात आला. एन-११, एन-८, राजनगर आदी केंद्रांवर मोठ्या संख्येने गर्दी झाली. रांगेत जाऊन नागरिकांचे लसीकरणही सुरू झाले. अचानक १२.३० वाजता केंद्र शासनाचे सर्व्हर डाऊन झाले. ॲपमध्ये नोंदणी करणे अशक्य झाले. तातडीने महापालिकेच्या वॉर रूमला माहिती देण्यात आली. सर्व्हर सर्वत्र बंद असल्याचे सांगण्यात आले. दीड तासांनंतर सर्व्हर पुन्हा सुरू झाले. सर्वच केंद्रांवर नागरिक थांबलेले होते. प्रत्येकाला पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. शहराला मिळालेला साठा शनिवार, सोमवारपर्यंत पुरेल एवढा आहे. आणखी वाढीव साठा मिळावा यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्याला जेवढा साठा मिळत आहे, त्यातील ५० टक्के महापालिकेला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.