आज लसीकरण बंद, एक दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:04 AM2021-04-11T04:04:22+5:302021-04-11T04:04:22+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात मेगा लसीकरण मोहीम सुरू केली आहे. शनिवारी ८ हजार ३८५ ...
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात मेगा लसीकरण मोहीम सुरू केली आहे. शनिवारी ८ हजार ३८५ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. आज, रविवारी मोहीम बंद असणार आहे. एक दिवसाच्या सुट्टीनंतर उद्या, सोमवारी पूर्ववत सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू होईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शनिवारी दिली.
शहरात ५ एप्रिलपासून सर्व ११५ वॉर्डांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या ठिकाणी दररोज पाच ते सहा हजार नागरिकांना लस दिली जात आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सध्या केवळ ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच लस दिली जात आहे. तरीदेखील सर्व केंद्रांवर लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. आज, रविवारी मात्र या मोहिमेला एक दिवसाची सुट्टी असणार आहे. लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे. उद्या, सोमवारी ही मोहीम पूर्वीप्रमाणेच सुरू होईल, असे पाडळकर यांनी सांगितले.
शहरात लसींचा तुटवडा जाणवत आहे. शनिवारच्या लसीकरणानंतर महापालिकेकडे केवळ १० हजार लसींचा साठा शिल्लक होता. आता रविवारी लसीकरण बंद राहणार आहे. सोमवारी दिवसभरात सुमारे सात हजार लसींचा साठा लागू शकतो. त्यामुळे मंगळवारी (दि. १३) लस उपलब्ध झाली नाही तर मात्र ही मोहीम बंद पडू शकते. दरम्यान, महापालिकेने एक लाख लसींची मागणी नोंदविलेली असून, शासनाकडून लवकरच लस उपलब्ध होईल, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.