कोरोनाविरुद्ध लसींची ढाल अखेर औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:02 AM2021-01-15T04:02:07+5:302021-01-15T04:02:07+5:30
औरंगाबाद : अवघ्या देशवासीयांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते, ती लस अखेर बुधवारी सकाळी पुण्याहून औरंगाबादेत दाखल झाली. ...
औरंगाबाद : अवघ्या देशवासीयांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते, ती लस अखेर बुधवारी सकाळी पुण्याहून औरंगाबादेत दाखल झाली. कोरोनाविरुद्ध गेल्या १० महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध जिंकण्यासाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी मराठवाड्यास लसीचे १ लाख ३० हजार ५०० डोस मिळाले. यात औरंगाबाद आरोग्य उपसंचालक विभागास ६४ हजार ५०० डोस प्राप्त झाले, तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ३४ हजार डोस मिळाले आहेत.
देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारपासून लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागांत रवाना होण्यास सुरुवात झाली. औरंगाबादसाठी बुधवारी पुण्याहून पहाटे पाच वाजता लसींचे बॉक्स घेऊन निघालेला कंटेनर सकाळी नऊ वाजता सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात दाखल झाला. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांच्या उपस्थितीत लसींचा साठा उतरवून घेण्यात आला. फार्मासिस्ट संजय भिवसने, रामअप्पा गुजरे यांनी लसीचे बॉक्स केंद्रातील कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही येथे भेट दिली. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, औषध निर्माण अधिकारी वर्षा औटे, आदी उपस्थित होते. औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबादसह जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लसीचे ६४ हजार ५०० डोस प्राप्त झाले आहेत. त्यांचे जिल्ह्यानुसार वितरणही करण्यात आले.
लातूर विभागासाठी ६६ हजार डोस रवाना
लातूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गंत लातूरसह नांदेड, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांसाठी ६६ हजार डोस मिळाले. हे डोस घेऊन आरोग्य विभागाचे अन्य वाहन लातूरला रवाना झाले.
औरंगाबाद आरोग्य उपसंचालक विभागास मिळालेले डोस
जिल्हा- डोसेसची संख्या
औरंगाबाद -३४,०००
जालना -१४,५००
परभणी -९,५००
हिंगोली -६,५००
एकूण -६४,५००
छावणीसाठी १९०, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ४० लस
औरंगाबाद जिल्ह्याला मिळालेल्या ३४,२६० डोसमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३४,०३०, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ४० आणि छावणीतील कर्मचाऱ्यांसाठी १९० डोस मिळाल्या आहेत.
शहरासाठी २० हजार, तर ग्रामीणसाठी १४ हजार डोस
शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेला २० हजार डोसचे वितरण करण्यात आले, तर जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गंत असलेल्या ग्रामीण भागांतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १४ हजार डोस मिळाले.
--
ठळक मुद्दे
- प्रशिक्षण केंद्रात लसींचे मोठे ५ बॉक्स व काही छोटे बॉक्स ठेवण्यात आले.
- एका बॉक्समध्ये १ हजार २०० व्हायल्स (बाटल्या)
- एक व्हायल ५ ‘एमएल’ची आहे.
- एका व्हायल्समधून १० जणांना डोस दिला जाणार.
- औरंगाबाद विभागासाठी लसींचे एकूण ६ हजार ४५० व्हायल्स प्राप्त.
- एका मोठ्या बॉक्समध्ये लसीचे १२ हजार डोस.