लसींचे वेस्टेज प्रमाण पुण्यात सर्वांत जास्त, पालघर, ठाणे, औरंगाबादेत कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:02 AM2021-08-12T04:02:02+5:302021-08-12T04:02:02+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक म्हणून आलेली कोव्हॅक्सिन लस वाया (वेस्ट) जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक म्हणून आलेली कोव्हॅक्सिन लस वाया (वेस्ट) जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. लस काही प्रमाणात वाया जात असली तरी ही फार चिंताजनक स्थिती नसून, एकूणच महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण नगन्यच आहे. अनेक जिल्ह्यांत लस वाया जाण्याचे प्रमाण वजामध्ये (मायनस) आहे. कारण लसीच्या एका वायल्समध्ये १० ऐवजी ११ ते १३ डोस आले. परिणामी अनेक जिल्ह्यांत अपेक्षेपेक्षा जास्त लसीकरण होत आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणात १० टक्के डोस हे वेस्टेज पकडण्यात येतात. परंतु राज्यातील केवळ १२ जिल्ह्यातच कोव्हॅक्सिन वाया जाण्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात आहे, तर अन्य ठिकाणी कोव्हॅक्सिन वाया जाण्याचे प्रमाण शून्यच आहे. त्याउलट पुणे, वाशिम आणि नांदेड येथेच कोविशिल्ड लस वाया जाण्याचे प्रमाण आहे. अन्य जिल्हे लस वाया जाण्यात मायनसमध्येच आहेत. म्हणजे येथे लसीचा प्रत्येक थेंब वापरला तर जात आहे. त्याबरोबर एका वायलमध्ये काहीसे अधिक डोस येत असल्याने लसीकरणाचे प्रमाणही अधिक राहात असल्याचे दिसत आहे.
लस वाया जाण्याचे कारण
प्राप्त झालेल्या लसीच्या एका व्हायलमधून (बाटली) १० जणांना डोस देता येतो. एक व्हायल काढल्यानंतर चार तासांच्या आत वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानाही काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते.
लसीचे वेस्टेज मायनस म्हणजे काय
एका वायल्समधून दहा जणांना डोस मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही वायल्समधून ११, १२ तर कधी १३ जणांचे लसीकरण होते. कारण वायल्समध्ये जास्त लस येते. तेव्हा ही संख्या लसीच्या वेस्टेजमध्ये वजा (मायनस) म्हणून पकडली जाते. केरळमध्ये ही संख्या मायनसमध्येच आहे. कोविशिल्ड लसीच्या वेस्टेजमध्ये औरंगाबाद मायनसमध्ये येणे खूप मोठी बाब आहे, असे औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
--------
राज्यात लसीच्या वेस्टेजची स्थिती
जिल्हा------कोव्हॅक्सिन वेस्टेज (टक्के)-------कोविशिल्ट वेस्टेज (टक्के)
पुणे : २.८३-----१.५८
कोल्हापूर : २.२३---- वजा २.५१
सोलापूर : ०.२३------ वजा ०.६
सातारा : १.२२---वजा ३.७८
गडचिरोली : ०.४६-----वजा २.८६
उस्मानाबाद : ०.९९-- ---- वजा ०.९४
परभणी : १.३८ ------ ०.१५
ठाणे : ०.६९ ------ वजा २.५५
पालघर : ०.०४---- वजा ७.०६
मुंबई : १.३२---- वजा ७.६२
जालना : ०.९५--- वजा ०.८३
औरंगाबाद : ०.७४--- वजा ०.०२
नांदेड : वजा ०.३३ --- ०.०६
वाशिम : वजा १.६७ ---०.२८
(स्रोत: आरोग्य विभागाची आकडेवारी)
-------
दोन्ही लसींचे वेस्टेज मायन्समध्ये असलेले जिल्हा
अकोला : वजा ५.०७ --- वजा ४.८७
नागपूर : वजा १.९४--- वजा १.११
अमरावती : वजा २.२९--- वजा ३.६
बुलढाणा : वजा १.३६--- वजा २.१९
यवतमाळ : वजा १.५६ --- वजा ३.०६
भंडारदरा : वजा २.०४ --- वजा ०.२५
रत्नागिरी : वजा ०.०३ --- वजा २.७९
सांगली : वजा २.९७ --- वजा २.५४
सिंधुदुर्ग : वजा ०.८८ --- वजा ६.७४
वर्धा : वजा १.६५ --- वजा ३.९७
चंद्रपूर : वजा १.५४ --- वजा ४.२६
लातूर : वजा ०.४१--- वजा ०.६५
बीड : वजा १.६२ --- वजा २.१७
हिंगोली : वजा १.०६ --- वजा १.२४
नंदुरबार : वजा ३.३६--- वजा २.८६
धुळे : वजा १.१९--- वजा १.५८
नाशिक : वजा १.५८ --- वजा १.०९
जळगाव : वजा २.५६ --- वजा ७.७५
अहमदनगर : वजा ०.७--- वजा ०.८९