गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लस देणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 07:29 PM2019-07-02T19:29:45+5:302019-07-02T19:30:55+5:30
ही लस १५ वर्षांखालील मुलींना देणे महत्त्वपूर्ण असते.
औरंगाबाद : जगभरात कर्करोगाची एकच लस आहे आणि ती गर्भाशायाच्या मुखाच्या कर्करोगासाठी आहे. त्याद्वारे या कर्करोला प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यासाठी ही लस १५ वर्षांखालील मुलींना देणे महत्त्वपूर्ण असते. ती शासनाने सर्व स्तरावर उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचा सूर स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेतर्फे रविवारी ‘कॉलपोस्कोपी’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. याप्रसंगी जवळपास १०० स्त्रीरोगतज्ज्ञांची उपस्थिती होती. प्रमुख वक्त्या म्हणून मुंबई येथील डॉ. प्रिया गणेश यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. अनघा दिवाण, डॉ. आशा गायकवाड, डॉ. गौरी डंक, डॉ. कुणाल जाधव, डॉ. मीना बिलगी, डॉ. भट्टड यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. याप्रसंगी स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मोरे यांची उपस्थिती होती.
स्त्रियांना पांढरा स्राव होतो किंवा गर्भाशयाला जखम होते, तेव्हा कर्करोग होण्याचा धोका असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये, म्हणून लस उपलब्ध आहे. ही लस देण्याचे योग्य वय म्हणजे १५ वर्षांखालील मुली. त्यामुळे हा कर्करोग टाळण्यासाठी प्रत्येक मुलीला ही लस दिली पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले. डॉ. अनुराधा अपसिंगेकर यांनी सूत्रसंचालन केले.
...तर गर्भाशय कर्करोग टाळणे शक्य
ब्रेस्ट कर्करोगापाठोपाठ गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आढळतो. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध आहे. मात्र, ही लस काहीशी महागडी आहे. ती शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे. वेळीच निदान केले तर गर्भाशय काढणे टाळणे शक्य आहे. भीतीपोटी कमी वयात गर्भाशय काढण्याची गरज नसते, असे औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मोरे म्हणाल्या.