वैजापूर नगरपालिकेसाठी दुपारी २ पर्यंत झाले ३८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:56 PM2018-04-06T14:56:01+5:302018-04-06T14:57:58+5:30
नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी ५४ उमेदवार उभे आहेत.
वैजापुर : येथील नगरपालिकेसाठी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी ५४ उमेदवार उभे आहेत.
मतदानासाठी सकाळपासूनच मतदात्यांचा उत्साह पाहण्यास मिळाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यन्त २८.९३ टक्के मतदान झाले. यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत ३७.८४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.१२) होणार आहे.
पालिकेच्या निवडणुकीसाठी ५१ बूथ तयार करण्यात आले आहेत. शहरातील ११ प्रभागात नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, ३७ हजार ७३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.ही निवडणूक प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संदिपान सानप व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.तसेच प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय राखीव कर्मचाऱ्यांची नेमणुकसुद्धा करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी स्वतंत्र मतदान यंत्र आहे.
यावेळी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम यासह अपक्षांमध्ये लढत होत आहे. सर्वात जास्त चुरस भाजपाचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पा परदेशी आणि शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या सुन ताशफा अजहर अली यांच्यात आहे. मतदार कोणाच्या हाती सत्ता देतील यासाठी सहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.