वाजपेयींना ठरले होते आर. आर. भारी!
By Admin | Published: February 17, 2015 12:00 AM2015-02-17T00:00:48+5:302015-02-17T00:39:37+5:30
$$्रिप्रताप नलावडे / संजय तिपाले, बीड २००४ चा तो काळ... जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीने तत्कालीन स्वच्छता व पाणीपुरवठा
$$्रिप्रताप नलावडे / संजय तिपाले, बीड
२००४ चा तो काळ... जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीने तत्कालीन स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री आर. आर. पाटील यांना बीडमध्ये पाठविले होते तर भाजपाने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाचारण करुन राष्ट्रवादीचा तंबू हादरवून सोडला होता. मात्र, आर. आर. पाटील यांनी ‘शाईनिंग इंडिया’, ‘फिलगूड’ या भाजपाच्या आश्वसानास्त्रांना परतावून लावत राष्ट्रवादीला जय मिळवून दिला होता. आर. आर. यांच्या अशा अनेक आठवणी सोमवारी ताज्या झाल्या.
आर. आर. पाटील यांचे बीडशी अतियश सलोख्याचे नाते होते. गटातटात विखुरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना एका मोळीत बांधण्याचे काम त्यांनी मोठ्या खुबीने केले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबतच्या वैयक्तिक मैत्रीला धक्का लागू न देता त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला फुलविण्याचे काम करुन कुशल संघटक असल्याचे दाखवून दिले होते. भाजपाचे खासदार जयसिंग गायकवाड २००४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार झाले होते. गायकवाड यांच्याविरोधात भाजपाने प्रकाश सोळंके यांना आखाड्यात उतरिवले होते. भाजपा व राष्ट्रवादीने संपूर्ण ताकद लावल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आग्रहाखातर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सोळंके यांच्यासाठी बीडमधील राजीव गांधी नगर परिसरात सभा घेतली होती. ‘शाईनिंग इंडिया, फिल गूड’ या मुद्द्यांची ढाल करुन भाजपाने तेंव्हा निवडणूका लढविल्या होत्या. वाजपेयींच्या सभेनंतर वातावरण भाजपामय झाले होते. मात्र, या वातावरणाला सुरुंग लावण्याचे काम केले होते आर. आर. पाटील यांनी. जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे हे पटवून देतानाच केंद्रात भाजपाचे सरकार आहे, मग तुम्ही का बंदी आणली नाही? असा रोकडा सवाल त्यांनी चंपावती मैदानावरील सभेत जाहीरपणे विचारला. पाटील यांच्या सभेनंतर वारे बदलले. निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादीचे गायकवाड ४८ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. गायकवाड यांच्या विजयात आर. आर. यांचा सिंहाचा वाटा होता;पण त्यांनी ना याचे श्रेय घेतले ना भांडवल केले.
आर. आर. यांनी बीडकरांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविले. बीड- अहमदनगर- परळी रेल्वेमार्गासाठी ते शेवटपर्यंत आग्रही होते.
४स्त्री भू्रण हत्या, काळेगाव (ता. केज) रेडिओ स्फोट, अफू प्रकरण घडले तेंव्हा ते गृहमंत्री होते.
४तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना मध्यरात्री फोन करुन त्यांनी रेडिओ स्फोटाचा छडा लागला पाहिजे, अशा सूचना केल्या होत्या. तपासानंतर कौतूक करुन पाच लाख रुपयांचे बक्षीसही दिले होते.
आर. आर. पाटील यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीला छेद देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बीडमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर, विनायक मेटे या दोन तलवारी एका म्यानात आणण्याची किमया करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. २००९ मध्ये आष्टीत धस, धोंडे, दरेकर या त्रिकुटास एकत्रित आणून त्यांनी ‘थ्रिडी पॅटर्न’ चा ऐतिहासिक चमत्कार केला होता. शिवाय गेवराईत दोन पंडितांमधील ताकद राष्ट्रवादीच्या मागे उभी करुन पक्षाला बळ देण्याच्या कामातही आर. आर. यांची भूमिका महत्त्वाची होती.