Valentine Day : सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले दाम्पत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:14 PM2019-02-14T12:14:56+5:302019-02-14T12:20:52+5:30
समाजकार्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो, असे सांगत शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा यांनी सहजीवनाचा प्रवास उलगडला
- रूचिका पालोदकर
औरंगाबाद : नवरा म्हणून निवड करताना ना त्याची नोकरी महत्त्वाची वाटली ना त्याच्याकडे घर आहे का, हा विचार डोक्यात आला. सांपत्तिक स्थितीपेक्षा त्याची एक माणूस म्हणून असणारी प्रतिमा, सामाजिक कार्यातले झपाटलेपण मनात भरले आणि आर्थिक, सामाजिक परिस्थितीत मोठी तफावत असूनही आम्ही समाजकार्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो, असे सांगत शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा या दाम्पत्याने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर त्यांचा सहजीवनाचा प्रवास उलगडून सांगितला.
सामाजिक क्षेत्रात वाहून घेतलेले शहरातील लोकप्रिय जोडपे म्हणजे शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा. त्यांचा सहजीवनाचा अनुभव ४० वर्षांपेक्षाही मोठा. राशीन (ता. वैजापूर) येथील सुखवस्तू मारवाडी घरात वाढलेल्या मंगलतार्इंची वयाच्या जेमतेम १८ व्या वर्षी शांताराम यांच्याशी गाठ पडली. युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते असणाऱ्या शांताराम यांनी पूर्णवेळ चळवळीसाठी देण्याचे ठरविले आणि त्यासाठी घर (मुंबई) सोडून त्यांनी मराठवाडा कार्यक्षेत्र निवडले. याच दरम्यान दोघांची भेट झाली, विचार जुळले आणि त्यांचा विवाह झाला. लग्न झाले तेव्हा खिशात दमडीही नव्हती. भूक लागली तर काय खाणार, असा प्रश्न होता. पण संघटना आणि बांधिलकी मानणारे कार्यकर्ते, त्यांच्याशी शांतारामचे जोडलेले नाते यामुळे भूक पळूनच गेली, असे मंगलताई आवर्जून सांगतात.
दोन परस्परविरोधी आर्थिक-सांस्कृतिक वातावरण व विपरीत परिस्थितीतून संघर्ष करत जात असताना आणि एकाच ध्येयाने बांधले गेलो असल्यामुळे दोघांतील नाते काळानुसार अधिकच मजबूत होत गेले. जीवनातील अत्यंत कठीण काळात मंगलने ज्या कमालीच्या धीराने परिस्थितीला तोंड दिले, तसे कदाचित मलाही जमले नसते. मंगलच्या या धैर्य व योगदानाला साष्टांग दंडवत, असे शांताराम प्रांजळपणे कबूल करतात.
तो सोनेरी क्षण
जिद्द, चिकाटी, कसोटी, तत्त्वाने जगणे यातूनही माणूस मोठा होतो. मोठे होण्यासाठी पैसा लागत नाही. आमच्या दोघांच्या आयुष्यात पैसा हा कधी महत्त्वाचा नव्हता आणि असणारही नाही. या सहजीवनात कधी उपाशी राहिलो, कधी अनवाणी चाललो; पण साथ सोडली नाही. माणूस म्हणून जगणारा आणि इतरांनाही तसे जगण्याचा अधिकार देणारा सहचर असावा लागतो. म्हणूनच लग्न करण्याचा निर्णय हा आमच्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता, असे या द्वयांनी सांगितले.