Valentine Day : समाजाने दुर्धर आजारामुळे नाकारलेल्या ६८ मुलांना ‘प्रेम’ देणारं जोडपं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:28 AM2019-02-14T11:28:54+5:302019-02-14T11:30:53+5:30

एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. 

Valentine Day: they nurture 68 children who are rejected by the society due to untimely illness | Valentine Day : समाजाने दुर्धर आजारामुळे नाकारलेल्या ६८ मुलांना ‘प्रेम’ देणारं जोडपं!

Valentine Day : समाजाने दुर्धर आजारामुळे नाकारलेल्या ६८ मुलांना ‘प्रेम’ देणारं जोडपं!

googlenewsNext

- सोमनाथ खताळ 

बीड : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...’ मंगेश पाडगावकर यांची ही कविता सर्वांना परिचित असेल. तरुणांसाठी हे कदाचित खरंही असेल. मात्र, समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी हे पूर्ण उलटे आहे. हल्ले, खोटे गुन्हे, अपमान यांचा सामना करून त्यांना आजही समाजातील ‘प्रेम’ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. १७ वर्षांच्या संघर्षावर मात करून एड्ससारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या तब्बल ६८ मुलांना मायेची ऊब आणि हक्काचे ‘प्रेम’ देण्याचे काम बीड जिल्ह्यातील संध्या व दत्ता बारगजे हे जोडपे करीत आहे. 

संध्या बारगजे यांचे शिक्षण एम.ए., बी.एड. तर दत्ता बारगजे यांनी पॅथॉलॉजी पदवी प्राप्त केलेली. १९९५ साली त्यांचा विवाह झाला. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा प्रकल्पापासून अवघ्या दोन कि़मी. अंतरावर असलेल्या भामरागड ग्रामीण रुग्णालयात दत्ता बारगजे यांना नोकरी लागली. वैद्यकीय तपासणी आणि शिबिरांमुळे त्यांचे हेमलकसात जाणे-येणे वाढले. बाबा आमटे यांचा सहवास आणि प्रकाश आमटे यांच्यापासून प्रेरित होऊन आपणही सामाजिक कार्य करावे, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी हा प्रस्ताव अर्धांगिनी संध्या यांच्यासमोर मांडला. त्यांनी याला मंजुरी दिलीच. शिवाय सोबतीचेही वचन दिले. त्याप्रमाणे त्यांनी २००२ साली एमआयव्हीबाधित मुलांना आधार, परिवार आणि औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला. २००६ साली बिंदुसरेच्या तीरावर त्यांनी ‘इन्फंट इंडिया’ नावाचा प्रकल्प उभारला. ३ मुलांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या ३४ मुली आणि ३४ मुले, अशी एकूण ६८ मुले राहत आहेत. याच मुलांवर ते आज पोटच्या मुलांप्रमाणेच ‘प्रेम’ करीत आहेत. 

२००२ ते २०१९ या कालावधीत बारगजे दाम्पत्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागला. ५०० मीटरवर पाणी असतानाही त्याला हात लावण्यास मज्जाव करण्यात आला. शाळेत मुलांना प्रवेश घेऊ दिला नाही. अनेकांनी हल्ले चढविले, अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल केले. असे असतानाही या जोडप्याने माघार घेतली नाही. अनाथांचे ‘प्रेम’ आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यावर मात केली आणि आज राज्यातील आदर्श प्रकल्प बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  

आठ महिलांना ‘आधार’
६८ मुलांबरोबरच ८ महिलांनाही इन्फंट इंडियामध्ये आश्रय दिला आहे. त्यांच्यासाठी ‘आधार केंद्र’ सुरू केले आहे. यातील बहुतांश महिलांची मुले उच्चशिक्षित असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी नाकारल्यानंतर त्यांना बारगजे दाम्पत्याने जे ‘प्रेम’ दिलं, ते कुठल्याही ‘व्हॅलेंटाईन डे’ पेक्षा कमी नाही.

Web Title: Valentine Day: they nurture 68 children who are rejected by the society due to untimely illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.