व्हॅलेंटाईन डे : औरंगाबादेत आज येणार प्रेमाला उधाण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:52 PM2018-02-13T23:52:39+5:302018-02-13T23:52:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : ज्याच्या प्रेमात पडलो आहोत, त्याला इच्छा असूनही आपण अनेकदा आपल्या मनातल्या भावना सांगू शकत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ज्याच्या प्रेमात पडलो आहोत, त्याला इच्छा असूनही आपण अनेकदा आपल्या मनातल्या भावना सांगू शकत नाहीत. म्हणूनच मग प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाई आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’कडे उत्तम मुहूर्त म्हणून पाहते आणि ‘टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात...’ अशा अवस्थेत सारा धीर एकवटून हुरहुरत्या हृदयाने आपल्या प्रिय व्यक्तीकडे प्रेमाची कबुली देते. त्यामुळेच प्रेमवीरांसाठी खास असणारा हा ‘व्हॅलेंटाईन डे’ आज जणू प्रेमाचे उधाण घेऊन आला आहे.
आजचा हा दिवस खास ठरावा म्हणून बाजारपेठही विविध आकर्षक भेटवस्तूंनी सज्ज झाली आहे. प्रेमाचा रंग लाल किंवा गुलाबी असतो, असे मानले जाते. त्यामुळेच लाल रंगाची फुले, लाल रंगाच्या कागदात रॅप केलेली चॉकलेट्स, लाल-गुलाबी रंगातली टेडी बेअर्स, लाल-गुुलाबी रंगाचे भेटकार्ड यामुळे जणू अवघे शहरच प्रेमाच्या गुलाबी रंगात रंगल्यासारखे वाटत
आहे.
यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन क्रेझ’बद्दल सांगताना सुहास देशपांडे म्हणाले की, ‘सेव्हन डेज कि ट’, ‘फोटो प्रिंट’, ‘लव्ह बुक’, ‘कपल टी-शर्ट’ या गोष्टींना तरुणाईची सगळ्यात जास्त पसंती मिळत आहे. फोटो प्रिंटकडे तरुणाईचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून येते. यामध्ये हृदयाच्या आकाराची पिलो, कॉफी मग, ग्रिटिंग कार्ड, टी-शर्ट, मोबाईल कव्हर, बेडशीट यासारख्या गोष्टींवर आपल्या आवडत्या व्यक्तीचे फोटो प्रिंट करून हे गिफ्ट म्हणून देण्यात येत आहे. कपल टी शर्ट हा प्रकारही सध्या ‘इन’ आहे. यामध्ये आपल्या टी-शर्टवर आपल्या व्हॅलेंटाईनचा
फोटो प्रिंट करून तरुणाई कपल फोटो शूट करते आहे.
व्हॅलेंटाईन सेव्हन डेज किट हा प्रकारही यावर्षी पहिल्यांदाच पाहायला मिळतो
आहे. यामध्ये गुलाब, चॉकलेट्स, वॉॅच, टेडी, पिलो, ग्रिटिंग कार्ड, फोटो असे सात प्रकारचे गिफ्ट एकत्रित पॅक केलेले आहेत. याची किंमत साधारण १५०० रुपयांपासून पुढे आहे.
लव्ह बुक या प्रकारात प्रेमवीरांना आपली प्रेमकहाणी आकर्षक रीतीने मांडता येते. यामध्ये पहिली भेट, पहिले गिफ्ट, पहिल्यांदा दिलेली प्रेमाची कबुली अशा प्रेमातल्या सर्व पहिल्या गोष्टी कधी आणि कशा झाल्या हे आकर्षक पद्धतीने क्रमवार टिपून प्रेमकहाणी शब्दबद्ध करता येते. या सर्व नावीन्यपूर्ण गोष्टींचा उपयोग करून तरुणाई सध्या आपल्या ‘व्हॅलेंटाईन’ला खुश करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाºया लाल गुलाबालाही या दिवशी विशेष मागणी असते.व्हॅलेंटाईननिमित्त गुलाबाचे भावही चांगलेच वधारले आहेत. साध्या लाल गुलाबाची किंमत १० ते १५ रुपये असून, प्लास्टिकमध्ये रॅप केलेला गुलाब २० ते २५ रुपयांना मिळत आहे. गुलाब बुकेंचीही किंमत दुपटीने वाढली.
साधारणपणे ८ ते १० वर्षांपूर्वी शाळकरी मुले आणि व्हॅलेंटाईन डे यांचा काहीही संबंध नसायचा. असा कोणता प्रेम दिवस असतो हे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या गावीही नसायचे. आता मात्र व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय, हा दिवस कसा साजरा क रतात, याची इत्थंभूत माहिती असणारे अनेक शाळकरी विद्यार्थी दिसून येतात. ‘गर्लफे्रंड’, ‘बॉयफे्रंड’, ‘व्हॅलेंटाईन’, ‘अफेअर’ यासारख्या प्रेमातल्या संकल्पनाही या मुलांच्या डोक्यात स्पष्ट आहेत.
हम भी कुछ कम नहीं
‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणत विशेषत: इंग्रजी शाळांमधले हायस्कूलचे विद्यार्थी या दिवसाचे विशेष नियोजन करीत असल्याचेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हातात खुळखुळणारा मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यामुळे नकळत्या वयात मुलांच्या भावना प्रबळ होत असून, शाळकरी मुलांच्या प्रेमकथेवर येणारे ढिगभर चित्रपटही यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.