घाटी, ‘सिव्हिल’मध्येच नियमांकडे पाठ,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:02 AM2021-09-02T04:02:02+5:302021-09-02T04:02:02+5:30
मास्क, सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष : एका उपचारासाठी यायचे आणि घरी कोरोना घेऊन जाण्याची भीती संतोष हिरेमठ औरंगाबाद : घाटी ...
मास्क, सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष : एका उपचारासाठी यायचे आणि घरी कोरोना घेऊन जाण्याची भीती
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटी रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या नाॅनकोविड रुग्णांची संख्या वाढली आहे. पण, या दोन्ही ठिकाणी रुग्ण, नातेवाइकांकडून मास्क, सोशल डिस्टन्स पालनाकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालय प्रशासनही त्यासंदर्भात फार काळजी घेताना दिसत नाही. रुग्णालयांमध्येच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष होत असेल, तर तिसरी लाट रोखणार कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.
तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे प्रशासनातर्फे आवाहन केले जाते. मात्र, या गोष्टींकडे घाटी आणि जिल्हा रुग्णालयाचे दुर्लक्ष होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मध्ये आढळून आले. रुग्ण, नातेवाईक मास्कविना वावरत असताना त्यांना कर्मचारीही हटकत नाहीत. घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोनाची लागण झालेली असली तरी अनेकदा लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे रुग्णालयात मास्क, सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष केल्यास एका आजाराच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये यायचे आणि घरी कोरोना घेऊन जायचा, अशी भीती नाकारता येत नाही. मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन होईल, यासंदर्भात खबरदारी घेतली जाईल, असे घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. काशीनाथ चौधरी म्हणाले.
ओपीडी हाऊसफुल्ल
- घाटी रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज १२०० ते १८०० रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकदा ही संख्या अडीच हजारांपर्यंत जाते.
- जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीत रोज १५० ते २०० रुग्ण येत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच येथे ओपीडी सुरू झाली असून नाॅनकोविड रुग्ण वाढत आहेत.
- या दोन्ही रुग्णालयांत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत असे सर्वच रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होईल, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
--------
डेंग्यूसदृश, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात सध्या डेंग्यूसदृश लक्षणे असलेले, सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तापाचा एखादा रुग्ण कोरोना संशयित वाटल्यास कोरोना तपासणी करण्यासाठी स्वॅब घेतला जातो.
-----
रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नये
घाटी रुग्णालयात रुग्णांबरोबर नातेवाइकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. जिल्हा रुग्णालयातही आता नाॅनकोविड रुग्ण, नातेवाइकांची वर्दळ वाढत आहे. योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ही रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------
काळजी घेण्यावर भर
डाॅक्टरांच्या कक्षात एक रुग्ण असल्यावर दुसऱ्या रुग्णाला बाहेरच थांबविण्यात येते. कर्मचाऱ्यांकडून रुग्ण, नातेवाइकांना मास्क लावण्याची वारंवार सूचना केली जाते. रुग्ण नोंदणीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन होईल, यावर भर दिला जात आहे.
- डाॅ. प्रदीप मुरंबीकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
-----
सोशल डिस्टन्सचा फज्जा
घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्ण नोंदणीच्या कक्षातून चिठ्ठी काढण्यासाठी रुग्ण, नातेवाइकांच्या रांगा लागतात. रांगेत सोशल डिस्टन्स पाळले जाईल, याचे कोणतेही नियोजन नाही. अपघात विभागातील नोंदणी कक्षासमोरदेखील हीच स्थिती पाहायला मिळाली. जिल्हा रुग्णालयातही सोशल डिस्टन्सच्या पालनाकडे दुर्लक्ष होत आहे.
--
रुग्णालयात सर्रासपणे विनामास्क वावर
जिल्हा रुग्णालयात कोणाचा मास्क मानेखाली, कोणाचा हनुवटीला पाहायला मिळाला, तर काही जण विनामास्कच रुग्णालयात येत असल्याचे दिसून आले. घाटी रुग्णालयातही ओपीडी, अपघात विभागासह परिसरात अनेक जण मास्कशिवाय बिनधास्त वावरताना दिसून आले.