घाटी, ‘सिव्हिल’ला हवे १५० व्हेंटिलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:02 AM2021-04-05T04:02:17+5:302021-04-05T04:02:17+5:30
औरंगाबाद : गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर महत्त्वपूर्ण ठरते. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने घाटी रुग्णालयास १०० आणि जिल्हा रुग्णालयास ५० ...
औरंगाबाद : गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर महत्त्वपूर्ण ठरते. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने घाटी रुग्णालयास १०० आणि जिल्हा रुग्णालयास ५० व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. या व्हेंटिलेटरचा त्वरित पुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक आणि हाफकिनला दिला आहे.
जिल्ह्यात दररोज कोरोनामुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यात गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची शोधाशोध करावी लागत असल्याचे वास्तव आहे. रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; परंतु सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. कोरोनाचा रुग्ण असो की अन्य गंभीर आजारांचा रुग्ण; त्याच्यावर सध्या व्हेंटिलेटरसाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची नामुष्की ओढवत आहे. घाटीपाठोपाठ जिल्हा रुग्णालयातही गंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणीही गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. घाटीला १०० आणि जिल्हा रुग्णालयाला ५० असे १५० व्हेंटिलेटर लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
२६२ व्हेंटिलेटर उपलब्ध
औरंगाबादेत २६२ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. यात घाटीत ११० आणि जिल्हा रुग्णालयात २५ व्हेंटिलेटर आहे. परंतु ही फक्त कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरची संख्या आहे.
घाटीत ४४२ रुग्ण गंभीर
एकट्या घाटी रुग्णालयात ४४२ गंभीर रुग्ण आहेत. खासगी रुग्णालयातील संख्याही अधिक आहे. त्यात अचानक प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. जिल्हा रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या ६७ रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.