घाटीतील डॉक्टरांनी मुलाला दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 08:32 PM2019-01-18T20:32:50+5:302019-01-18T20:35:30+5:30
घाटी रुग्णालयाच्या बालरोग विभागाने दहा वर्षीय बालकाला औषधोपचार करून आजारातील गुंतागूत दूर केली.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या बालरोग विभागाने दहा वर्षीय बालकाला औषधोपचार करून आजारातील गुंतागूत दूर केली. त्यामुळे अंथरुणावर खिळून असलेला बालक आता चालू-फिरू लागला असून, तो शाळेतही जायला लागला आहे. आम्ही आशा सोडून दिली होती, पण घाटीतील डॉक्टरांनी मुलाला जीवदान दिले, आशा भावना त्याच्या कुटुंबियांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.
बाचोटी (ता. कंधार) येथे चौथीत शिकणाऱ्या शिवप्रसाद स्वामी याला जुलै २०१८ मध्ये अचानक चक्कर आली. त्यानंतर त्याला झटके येण्यास सुरुवात झाली. त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर २० दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटीत बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या युनिटने वॉर्ड २४ मध्ये त्याच्यावर यशस्वी उपचार केले. योग्य निदान झाल्याने त्याचे झटके बंद झाले. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सुटी मिळाली. त्यावेळी तो त्याच्या पायावर चालत घरी गेला.
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, डॉ. स्मिता मुंदडा, डॉ. प्राजीत गिवर्गीस, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. वर्षा चौरे, डॉ. हिना कौसर, डॉ. निला जोशी, डॉ. निलेश हातझाडे यांनी शिवप्रसादवर उपचार केले. तसेच रजनी कुलकर्णी, स्वरुपा खेकडे यांच्यासह परिचारिका आणि कर्मचा-यांनी प्रयत्न केल्याने शिवप्रसादला नवे आयुष्य मिळाल्याचे त्याचे काका धनंजय स्वामी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
मेंदूचा टीबी
घाटीत या बालकाच्या मेंदुच्या टीबीचे वेळीच निदान झाले. त्यामुळे उपचार यशस्वी करता आले. या आजाराचे बालरोगात दोन ते तीन टक्के प्रमाण आहे. त्याचे पालक नियमित तपासणीसाठी येतात.
-डॉ. प्रभा खैरे, विभागप्रमुख, बालरोग विभाग, घाटी रुग्णालय