डाॅक्टर आई-वडिलांपाठोपाठ घाटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:03 AM2021-07-01T04:03:57+5:302021-07-01T04:03:57+5:30

डाॅ. अब्दुल माजीद यांचे कुटुंब रुग्णसेवेत : मोठ्या मुलाचे ‘कोविड’मध्ये कर्तव्य, लहान मुलगा ‘एमबीबीएस’च्या तृतीय वर्षात संतोष हिरेमठ औरंगाबाद ...

In the valley, following the doctor's parents | डाॅक्टर आई-वडिलांपाठोपाठ घाटीत

डाॅक्टर आई-वडिलांपाठोपाठ घाटीत

googlenewsNext

डाॅ. अब्दुल माजीद यांचे कुटुंब रुग्णसेवेत : मोठ्या मुलाचे ‘कोविड’मध्ये कर्तव्य, लहान मुलगा ‘एमबीबीएस’च्या तृतीय वर्षात

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांना आशेचा किरण ठरणाऱ्या घाटी अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आई-वडिलांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवेच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्याच घाटी रुग्णालयात दोन्ही मुलांचे वैद्यकीय शिक्षण. मोठ्या मुलाने नुकतेच एमबीबीएस पूर्ण करून ‘कोविड’मध्ये रुग्णसेवा दिली, तर लहान मुलगा ‘एमबीबीएस’च्या तृतीय वर्षात आहे. हा फक्त योगायोग नसून आई-वडिलांपाठोपाठ वैद्यकीय शिक्षणासाठी मुलांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हे कुटुंब आहे न्यूरोलाॅजिस्ट डाॅ. अब्दुल माजीद यांचे.

उदगीर येथे मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या डाॅ. माजीद यांचे १९९२ मध्ये घाटीत एमबीबीएस झाले. त्यानंतर येथेच एमडी मेडिसिन केले. त्यानंतर केईएम हाॅस्पिटल येथे वर्ष २००० मध्ये त्यांचे डीएम झाले. गेल्या २१ वर्षांपासून ते डीएम न्यूरोलाॅजिस्ट म्हणून शहरात रुग्णसेवा देत आहेत. त्यांच्या पत्नी पॅथाॅलाॅजिस्ट डाॅ. सारा सुलताना यांचेही वैद्यकीय शिक्षण घाटीत झालेले आहे. डाॅ. माजीद यांना केईएम, काॅर्पोरेट रुग्णालये, इंग्लंड आणि ‘गल्फ’मध्ये जाऊन स्थायिक होण्याची संधी होती; परंतु या दोन्ही डाॅक्ट पती-पत्नीने मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी स्वत:ला वाहून घेण्याचा निर्णय घेतला आणि अनेक वर्षांपासून त्यांची अविरतपणे रुग्णसेवा सुरू आहे.

डाॅ. माजीद जेव्हा न्यूरोलाॅजिस्ट झाले, त्यावेळी मराठवाड्यात नांदेड, लातूर, परभणी कुठेच न्यूरोलाॅजिस्ट नव्हते. औरंगाबादेत दोन ते तीन न्यूरोलाॅजिस्ट होते. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील; पण औरंगाबादेतच रुग्णसेवा द्यायची, असा निर्णय घेऊन ते पुढे गेले.

-----

१०० रुपयांत दिले उपचार

डाॅ. माजीद यांनी नांदेड येथे जाऊन अवघ्या १०० रुपयांत रुग्णांना उपचार दिले. आजही ते १० टक्के ओपीडीची सेवा मोफत देतात. एखाद्या रुग्णाकडे पैसे नसेल तर ही बाब त्यांचा लक्षात येतेच. तेव्हा ते स्वत: मदत करतात.

---

डाॅक्टर होण्यासाठी आजोबांकडून प्रेरणा

आजोबा हे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स (आरएमपी) होते. ते नेहमी म्हणत असत की, पूर्ण डाॅक्टर होऊ शकलो नाही, तू डाॅक्टर हो. वडील इंजिनिअर होते. आजोबा नेहमीच त्यांनी प्रसूती कशा केल्या, शस्त्रक्रिया कशा केल्या, पाऊस पडत असतानाही गावात जाऊन कसे उपचार केले, हे सांगत असत. त्यामुळे आजाेबांकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच आपण डाॅक्टर होऊ शकलो, असे डाॅ. अब्दुल माजीद म्हणाले.

---

केईएम, जे.जे. मिळत असताना मुलांनी केली घाटीची निवड

डाॅ. माजीद यांचा मोठा मुलगा डाॅ. मोहंमद साद यांचे नुकतेच घाटीत एमबीबीएस पूर्ण झाले असून, इंटर्नशिप सुरू आहे. ते कोरोना रुग्णसेवेत आहेत, तर लहान मुलगा मोहंमद सफी हा तृतीय वर्षात आहे. दोघांना वैद्यकीय शिक्षणासाठी केईएम, जे. जे. मिळत होते; परंतु त्यांनी घाटीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळाली नाही तर खाजगीत किती पैसे लागतील, याचा विचार डाॅ. माजीद करीत होते. तेव्हा ही बाब डाॅ. मोहंमद साद यांना कळाली. डोनेशन देऊन नव्हे तर गुणवत्तेवर शिक्षण घ्यायचे, असे डाॅ. साद म्हणाले होते. ते त्यांनी साध्यही केले.

----

फोटो ओळ...

न्यूरोलाॅजिस्ट डाॅ. अब्दुल माजीद यांच्यासह मुलगा डाॅ. मोहंमद साद आणि मोहंमद सफी.

Web Title: In the valley, following the doctor's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.