औरंगाबादचे घाटी रूग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:33 AM2018-05-11T00:33:34+5:302018-05-11T00:35:44+5:30
घाटी रुग्णालयास औषधीटंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक औषधांच्या टंचाईमुळे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयास औषधीटंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक औषधांच्या टंचाईमुळे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर आहे. अनेक महत्त्वाची औषधी उपलब्धच नाही. प्राथमिक स्वरूपाची औषधी आणि साहित्याचाही तुटवडा आहे. त्यामुळे दररोज बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागातील गोरगरीब रुणांचे हाल होत आहेत.
घाटीत दररोज मराठवाड्यासह विदर्भ आणि लगतच्या भागातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये एकट्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज १,७०० ते २,००० रुग्णांवर उपचार होतात. यातील अनेकांना आंतररुग्ण विभागात दाखल केले जाते. घाटीत वर्षभर कोणत्या ना कोणत्या औषधांची टंचाई निर्माण होते; परंतु गेल्या पाच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागत आहे.
औषधी खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच तिच्या खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ‘हाफकिन’ कंपनीकडूनच औषधी खरेदी होणार आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधी उपलब्ध होण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. घाटी रुग्णालयात जानेवारी महिन्यात झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत औषधी तुटवड्यावर चर्चा करण्यात आली. मात्र, चार महिन्यांनंतरही घाटीतील परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
रुग्णांचे नातेवाईक म्हणतात...
घाटी परिसरातील औषधी दुकानातून औषधी आणि सलाईन खरेदी करणाऱ्या एका नातेवाईकाने म्हटले की, परिस्थितीमुळे मोठ्या आशेने रुग्णाला घाटीत दाखल केले. चांगले उपचार मिळाले; परंतु औषधी आणि सलाईनसाठी हातात चिठ्ठी देण्यात आली. पैशांची जुळवाजुळव करून औषधी आणि सलाईन खरेदी केली. त्यासाठी जवळपास एक हजार रुपये गेले.
...या औषधींचा तुटवडा
रुग्णालयात सलाईनची टंचाई सर्वाधिक आहे. आरएल, एनएस हे सलाईन्स उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. पॅरासिटामोलसारखे प्राथमिक औषधही उपलब्ध नाही. प्रतिजैविके नाहीत. शहरात दररोज दहा ते पंधरा जणांना मोकाट कुत्रे चावा घेत आहेत. तरीही अॅन्टिरेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) उपलब्ध होत नाही. मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींचा ठणठणाट आहे. कफ सिरपदेखील उपलब्ध नाही. बेटाडिनसारखे प्राथमिक वैद्यकीय साहित्य नसल्याने रुग्णालयात अडचणी निर्माण होत आहेत.
...
पुढील आठवड्यात खरेदी
हाफकिन कंपनीकडून गाईडलाईन मिळत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर औषधी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाह्यरुग्ण विभागात काही औषधींचा तुटवडा आहे. पुढील आठवड्यात औषधी खरेदी केली जाईल. रुग्णांची हेळसांड होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
-डॉ. कानन येळीकर,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)