घाटी रुग्णालयातील प्राध्यापकाची ‘आरटीओ’त सेवा; पाचच मिनिटात देतात वैद्यकीय प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 03:28 PM2019-10-14T15:28:52+5:302019-10-14T15:39:23+5:30
प्राध्यापकाची शासकीय रुग्णालयात सेवा, तरी चालते असेही काम
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असे एकही साहित्य नाही. ना डोळ्यांची तपासणी, ना कानांची, ना अपंगत्वाची. तरीही अवघ्या पाच मिनिटात चालक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. तेही घाटीतील मेडिसिन विभागात कार्यरत सहयोगी प्राध्यापकांकडून. शासकीय रुग्णालयात कार्यरत असताना आरटीओ कार्यालयात अशा प्रकारचे काम केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.डॉ. उद्धव खैरे, असे या डॉक्टरांचे नाव आहे. मेडिसिन विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. मेडिसिन विभागातील पथक (युनिट) क्रमांक-५ चे ते प्रमुख आहेत. दर शुक्रवारी त्यांची ओपीडी असते, अशी माहिती घाटी प्रशासनाकडून देण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत सहयोगी प्राध्यापकांना महिन्याकाठी जवळपास दीड लाख रुपये वेतन दिले जाते, तसेच खाजगी प्रॅक्टिस करू नये, यासाठी बेसिक वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता (एनपीए) मिळतो. तरीही डॉ. उद्धव खैरे हे चक्क आरटीओ कार्यालयात लायसन्स काढण्यासाठी आलेल्या चालकांना वैद्यकीय प्रमाणपत्र (मेडिकल सर्टिफिकेट) देत असल्याचा व्हिडिओच ‘लोकमत’ला प्राप्त झाला आहे. आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या जागेत एजंटांच्या गराड्यात उभे राहून ते हे काम करीत आहेत.
वैद्यकीय तपासणीसाठी लागणारे कुठलेही साहित्य नव्हते. केवळ पेन व शिक्क्यांच्या भरवशावर भराभर ‘फॉर्म १-ए’ या वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करून डॉ. खैरे मोकळे होताना या व्हिडिओत दिसतात. ना टेबल, ना खुर्ची, दुचाकीवर प्रमाणपत्राचा कागद टेकवून थेट शिक्का मारला जातो. त्यासाठी इतर आवश्यक कोणतेही साधन नाही. त्यामुळे कान, डोळे तपासणी ही तर फार दूरची गोष्ट आहे. त्यांच्यासोबत असलेला एक इसम अर्जावर छायाचित्र चिकटविण्याचे काम करतो. ५० रुपये लागतील, असे सुरुवातीलाच सांगितले जाते. डॉ. खैरे हे कुठेतरी बाजूला उभे राहतात. एखादा चालक येताच त्यांना आवाज देऊन बोलावून घेतले जाते. नंतर स्वाक्षरी आणि शिक्का मारला जातो, असे व्हिडिओत पाहावयास मिळते.
कोणत्याही तपासणीविना प्रमाणपत्र
वयाची चाळिशी गाठलेल्यांना वाहन परवाना काढताना, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढताना किंवा वाहन परवानाचे नूतनीकरण करून घेताना संबंधित चालक हा शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्याचा नियम आहे. या प्रमाणपत्राशिवाय आरटीओ परवाना देत नाहीत. अर्जदार चालक हा अपंग तर नाही ना, याची तपासणी करीत त्याच्या डोळ्यांची आणि कानांची तपासणी प्राधान्याने करावी लागते; परंतु तसे काहीही होताना दिसत नाही.
प्रशासकीय कारवाई होईल
डॉ. उद्धव खैरे हे घाटीत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते आरटीओ कार्यालयात जाऊन वैद्यकीय प्रमाणपत्र देत असतील, तर ते अत्यंत चुकीचे आहे. हे जर सिद्ध झाले, तर प्रशासकीय कारवाई केली जाईल.
-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
घाटीबाहेर काय करतात माहिती नाही
मेडिसिन विभागात डॉ. उद्धव खैरे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पथक क्रमांक-५ चे ते प्रमुख आहेत. घाटीबाहेर ते काय करतात, याविषयी काही बोलता येणार नाही.
-डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन विभाग, घाटी
नोंदणीकृत डॉक्टर पाहिजे
नोंदणीकृत डॉक्टर असेल, तरच वैद्यकीय प्रमाणपत्र देता येते. ४० वर्षांवरील व्यक्तीला लायसन्ससाठी हे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर ते देऊ शकतात का, हे संबंधित रुग्णालय प्रशासनच सांगू शकेल.
- सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी
कधी तरी जातो
आरटीओ कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी कधी तरी जातो. नियमितपणे जात नाही. घाटीतील रुग्णांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाते. त्यासाठी रुग्णालयातील राऊंड झाल्यानंतर जात असतो.
- डॉ. उद्धव खैरे, सहयोगी प्राध्यापक,घाटी