औरंगाबादकरांसाठी घाटीतील प्रयोगशाळा २४ तास कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:02 AM2021-04-25T04:02:51+5:302021-04-25T04:02:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यास ३-३ दिवस लागतात. परंतु, औरंगाबादेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यास ३-३ दिवस लागतात. परंतु, औरंगाबादेत अवघ्या १२ ते १८ तासांत म्हणजे एका दिवसाच्या आतच कोरोनाचा अहवाल मिळतो. त्यातून निगेटिव्ह नागरिक सुटकेचा नि:श्वास सोडतात, तर पाॅझिटिव्ह रुग्णांवर लवकर उपचार सुरु होणे शक्य होते. हे सगळे शक्य होत आहे ते फक्त घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेमुळे (व्हीआरडीएल). ही प्रयोगशाळा औरंगाबादकरांसाठी २४ तास सुरु असते. त्यामुळेच या प्रयोगशाळेने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर औरंगाबादेत कोरोना तपासणीची कोणतीही व्यवस्था नव्हती. घाटीत एनएबीएल अॅक्रिडेट टीबी लॅब होती. याठिकाणी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे यांनी प्रयत्न करून विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) ही स्वॅब तपासणी करणारी प्रयोगशाळा सुरु केली. या प्रयोगशाळेला पुणे येथील ‘एनआयव्ही’ची मान्यता मिळाली. २९ मार्च २०२० रोजी ही प्रयोगशाळा सुरु झाली. सुरुवातीला मराठवाड्यात कोरोनाच्या निदानासाठी कुठेही स्वॅब तपासणी होत नव्हती. तेव्हा ६ जिल्ह्यांतून येणारे संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घाटीतील ‘व्हीआरडीएल’मध्ये तपासण्यात येत होते.
गतवर्षी एप्रिल, मे महिन्यात जेव्हा अन्य शासकीय प्रयोगशाळेत रोज २०० ते ३०० स्वॅब तपासणी होत असे, त्यावेळी औरंगाबादेत एक हजार स्वॅबची तपासणी होत होती. ही प्रयाेगशाळा २४ तास सुरु असते. कोरोनाची लागण झाली की नाही, याचा अहवाल एकाच दिवसात मिळतो, तो फक्त घाटीतील प्रयोगशाळेमुळे. याठिकाणी आरटीपीसीआर तपासणीसाठी ७ यंत्रे आहेत. एका दिवसात ४ हजार तपासण्या करण्याची क्षमता या प्रयोगशाळेची आहे. विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) ही घाटीतील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या अंतर्गत येते. या विभागाच्या प्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे आहेत. राज्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख १९ हजार ३८८ आरटीपीसीआर तपासण्या या घाटीतील ‘व्हीआरडीएल’मध्ये झाल्या आहेत. या प्रयोगशाळेसाठी अधिष्ठाता, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे प्रयोगशाळा हे काम करू शकली. जिल्हा प्रशासनाने प्रयोगशाळेसाठी किटची कधीही कमतरता पडू दिली नाही.
-------
आरटीपीसीआर तपासणी
प्रयोगशाळा - एकूण तपासण्या
१) घाटी, औरंगाबाद - ३,१९,३८८
२) बीजेजीएमसी, पुणे - ३,११,८९८
३) एनआयव्ही, पुणे - ३,०४,३२६
४) आरसीएसएम जीएमसी, कोल्हापूर - २,८८,२८८
५) एमएमटीएच, नवी मुंबई - २,७९,९५३
६) आयजीएमसी, नागपूर - २,७३,२७९
७) जीएमसीएच नागपूर - २,३५,६१२
-----
फोटो ओळ
- घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी करताना कर्मचारी.
- सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे.