घाटीत नातेवाईकांची ‘कसरत’
By Admin | Published: July 28, 2015 12:46 AM2015-07-28T00:46:00+5:302015-07-28T01:21:40+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात हलविण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांनाच पार पाडावी लागत आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात हलविण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांनाच पार पाडावी लागत आहे. कर्मचारी जागेवर राहात नसल्यामुळे धावपळ करून नातेवाईकांना रुग्णांना स्ट्रेचरवरून तपासणी करून इतर कामांसाठी न्यावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम थेट नातेवाईकांच्या खांद्यावर पडत असून, याकडे घाटी प्रशासनाचे मात्र, दुर्लक्ष होत आहे.
घाटी रुग्णालयात संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गोरगरीब रुग्णभरती होतात. यातील अत्यवस्थ रुग्णांना स्टेचरवरून विविध विभागात हलवावे लागते. परंतु अपघात विभागात हे काम कर्मचाऱ्यांऐवजी रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: स्ट्रेचर ओढून घेऊन जावे लागत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. याशिवाय उपचारासाठी तसेच विविध तपासण्यांसाठी रुग्णाला एका विभागातून दुसऱ्या विभागात नेण्याचे कामही नातेवाईकांनाच करावे लागत आहे.
रुग्णांच्या सेवेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. परंतु कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात हलविण्यासाठी तारेवरची कसरत करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असून, कर्मचारी कमी असल्याचे कारण घाटी रुग्णालय प्रशासनाकडून दिले जात आहे.
महिला, ज्येष्ठांची दमछाक
रुग्णांस उपचारासाठी वेळेवर दाखल करण्यास नातेवाईक प्राधान्य देतात. त्यामुळे कोणतीही तक्रार न करता नातेवाईक स्वत: स्ट्रेचर ओढून नेतात. परंतु अनेकदा रुग्णांसोबत महिला, ज्येष्ठ नागरिक आलेले असतात. अशा वेळी स्ट्रेचर ओढून नेताना महिला आणि ज्येष्ठांची दमछाक होते. परंतु याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.