हृदय शस्त्रक्रियेसाठी घाटीचे दार बंद!
By Admin | Published: May 19, 2014 01:15 AM2014-05-19T01:15:37+5:302014-05-19T01:31:46+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) सर्जन असलेल्या डॉक्टरांनी सहा महिन्यांपूर्वी राजीनामा दिला.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) सर्जन असलेल्या डॉक्टरांनी सहा महिन्यांपूर्वी राजीनामा दिला. तेव्हापासून या विभागाला अर्धांगवायू झाला आहे. हृदयरोग विभागात नियमित कामकाज होते. मात्र, उरोशल्यचिकित्सा विभागात होणार्या सर्व शस्त्रक्रिया मागील सहा महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. हृदयरोग हा आजार आता केवळ श्रीमंतांचाच राहिलेला नसून, तो झोपडपट्टीपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य गरीब माणसाला हृदयरोग झाल्यास अत्यंत कमी खर्चात उपचार मिळावेत या दृष्टीने शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी अथक प्रयत्न करून घाटीत हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभाग सुरू केला. या विभागाची स्वतंत्र तीन मजली इमारत अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि खाजगी सुपरस्पेशालिटी रुग्णालयासही लाजवेल अशा आॅपरेशन थिएटरसह दिमाखात उभी आहे. २००८ साली या विभागाचे औपचारिक उद्घाटन झाले. तेव्हापासून हा विभाग कधी चालू, तर कधी बंद अशा स्थितीतच आहे. या विभागासाठी कायमस्वरूपी सर्जन्सची नियुक्ती करण्यात शासनाला अपयश आले. या विभागातील बाह्यरुग्ण विभागात रोज साधारणत: २० ते २५ नवे रुग्ण दाखल होतात. रुग्णांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने दोन हृदयरोगतज्ज्ञांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केलेली आहे. हे तज्ज्ञ डॉक्टर नियमितपणे रुग्णांची तपासणी करतात आणि त्यांना पुढील उपचार सुचवितात. त्यामुळे हृदयरोग विभाग बर्यापैकी कार्यान्वित आहे. उरोशल्यचिकित्सा नावाने सीव्हीटीएसचा दुसरा विभाग कार्यरत आहे. या विभागात बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी करण्यात येतात. त्यासाठी सुसज्ज दोन आॅपरेशन थिएटर अत्याधुनिक सुविधांसह तयार आहेत. एवढेच नव्हे तर शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारा प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफही उपलब्ध आहे. दोन भूलतज्ज्ञसुद्धा रुग्णसेवत तैनात असतात. एवढा सगळा लवाजामा असूनही केवळ हार्ट सर्जन्सची नियुक्ती न झाल्याने या विभागाला पॅरालिसिस झाला आहे. उरोशल्यचिकित्सा विभागात स्थापनेनंतर दोन वर्षांनी डॉ. महेश चौधरी या सर्जनची प्रतिनियुक्तीवर येथे बदली झाली होती. त्यांनी दिवसरात्र रुग्णसेवा केली. त्यानंतर ते राजीनामा देऊन निघून गेले. दोन वर्षे या विभागासाठी सर्जन मिळाला नव्हता. अहमदनगर येथील रहिवासी असलेले डॉ. भरत सोनी हे बंधपत्रित सर्जन गतवर्षी नोव्हेंबरमध्ये रुजू झाले. डॉ. भरत सोनी यांनी सर्जरी करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर दररोज किंवा एक दिवसाआड ते लहान-मोठे आॅपरेशन करू लागले. परिणामी, खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणार्या तेथील काही डॉक्टरांनी असहकार्याची भूमिका घेतली. याविषयी त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी जानेवारी महिन्यात ते राजीनामा देऊन निघून गेले. डॉ. सोनी यांनी राजीनामा दिला आणि हा विभाग पुन्हा अपंग झाला. सहा महिन्यांत या विभागात एकही बायपास सर्जरी झाली नाही. सर्जन मिळावा यासाठी पाठपुराव्याचा अभाव सीव्हीटीएसमधील सर्जन राजीनामा देऊन गेल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालकांना घाटीने कळविले. त्यानंतर मुंबईत बंधपत्रित हार्ट सर्जन्सच्या मुलाखती झाल्या. तेव्हा निदान एक हार्ट सर्जन औरंगाबादला मिळेल, अशी प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र, एकाही सर्जनने औरंगाबादला पसंती दर्शविली नाही. तसेच मानद प्राध्यापक डॉ. मनोहर काळबांडे यांचा कालावधी समाप्त झाल्याने तेही घाटीत येत नाहीत. सर्जनच नसल्याने हार्ट सर्जरी होणार नसल्याचे रुग्णांना सांगितले जाते. परिणामी, रुग्ण थेट खाजगी रुग्णालयाचा रस्ता धरतो.