'गायरान जमिनी नावावर करा'; वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाने आयुक्तालय दणाणले
By विजय सरवदे | Published: July 7, 2023 08:09 PM2023-07-07T20:09:14+5:302023-07-07T20:11:35+5:30
शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे कायम करा, या मागणीसाठी निघाला मोर्चा
छत्रपती संभाजीनगर : शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे कायम करण्यात यावीत, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयावर नेलेल्या मोर्चात जिल्ह्यातील अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपायुक्त (महसूल) पराग सोमण यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. भडकल गेटजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांनी केले.
आमखास मैदानमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. तिथे जिल्हाध्यक्ष योगेश बन, रुपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहराध्यक्षा वंदना नरवडे, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, पी. के. दाभाडे, संदीप जाधव, संघराज धम्मकीर्ती आदींच्या शिष्टमंडळाने उपायुक्त सोमण यांची भेट घेऊन अतिक्रमणधारकांच्या व्यथा मांडल्या व निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केलेल्या मागण्या अशा, शासकीय जमिनीवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना शासनाने बजावलेल्या नोटिसा तत्काळ रद्द कराव्यात, अतिक्रमणधारकांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, तिसगाव येथील शासकीय जमीन ही ग्रामसभेची मान्यता न घेता हस्तांतरित करण्यात आली आहे, ते हस्तांतरण रद्द करण्यात यावे, महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या ८६ हेक्टर जमिनीपैकी नागरी वसाहत, निवासी अतिक्रमण, धार्मिकस्थळांसाठी ४० हेक्ट्टर जमीन सोडण्यात यावी, साजापूर येथील तीन गटांतील शासकीय जमीन परस्पर जिल्हा उद्योग केंद्राला हस्तांतरित केली आहे, त्यातून स्मशानभूमी, कब्रथान, बुद्धविहार, शाळा आणि काही घरे झाली आहे, त्या जागा सोडण्यात याव्यात या अन्य मागण्यांचा समावेश आहे.
या वेळी बाबा पटेल, हरिदास बोर्डे, एस. पी. हिवराळे, सतीश महापुरे, प्रेम बनकर, अशोक त्रिभुवन, महिला आघाडीच्या सुलोचना साबळे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.