अनोखी भक्ती! छत्रपती संभाजीनगरात वरद गणेश, श्रीराम मंदिर जोडले २५ फुट लांब सेतूने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 05:54 PM2023-12-01T17:54:19+5:302023-12-01T17:55:01+5:30

भाविकांमध्ये आनंद, दोन धार्मिक संस्थेचा एकजुटीचे प्रतीक; २५ फूट लांब १० फूट रुंद, २० फूट उंच

Varad Ganesha, Shri Ram temple connected by 25 feet long bridge in Chhatrapati Sambhajinagar; Joy among devotees | अनोखी भक्ती! छत्रपती संभाजीनगरात वरद गणेश, श्रीराम मंदिर जोडले २५ फुट लांब सेतूने

अनोखी भक्ती! छत्रपती संभाजीनगरात वरद गणेश, श्रीराम मंदिर जोडले २५ फुट लांब सेतूने

छत्रपती संभाजीनगर : भाविकांच्या श्रद्धेचे स्थान बनलेले समर्थनगरातील श्री वरद गणेश मंदिर व श्रीराम मंदिराला जोडणारा सेतू (पूल) तयार करण्यात आला आहे. यामुळे मागील २५ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. दोन धार्मिक संस्थांतील पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीचे हा ‘श्रीराम सेतू’ प्रतीक बनला आहे.

समर्थनगरात १९७१ मध्ये श्री वरद गणेश मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर, १९८८-९० दरम्यान पाठीमागील बाजूस श्रीराम मंदिर उभारण्यात आले. वरद गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर, भाविकांना श्रीराम मंदिरात जाण्यासाठी पूर्व बाजूने सुमारे २०० मीटरपेक्षा अधिक रस्ता पार करून पाठीमागील बाजूस जावे लागत असे, तसेच दोन्ही मंदिरांच्या पायऱ्या चढणे व उतरणे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना हे थोडे त्रासदायक वाटत होते. यामुळे या दोन्ही मंदिरांदरम्यान ‘पूल’ बांधण्याची आवश्यकता होती. श्रीवरद गणेश मंदिर व श्रीराम मंदिराला जोडण्यासाठी २५ फूट लांब व १० फूट रुंदीचा ‘सेतू’ दोन महिन्यांत बांधण्यात आला आहे. या सेतूची जमिनीपासूनची उंची २० फुटांची आहे. यामुळे श्रीगणेश मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सेतुद्वारे पायी श्रीराम मंदिरात काही सेकंदांत जाता येणार आहे. यामुळे भाविकांचे २०० मीटरचा फेरा मारणे टळले आहे.

दोन्ही संस्थेच्या एकजुटीचे ‘सेतू’ प्रतीक
श्री गणेश सभा व श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक विचाराने भाविकांच्या सोयीसाठी ‘दोन्ही मंदिर’दरम्यान ‘सेतू’ उभारण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला. या संदर्भात आमच्यात बैठका झाल्या आणि अखेर ‘सेतू’ उभारला. दोन्ही धार्मिक संस्था एकत्र आल्यावर काय कार्य होऊ शकते, याचा प्रतीक ‘श्रीराम सेतू’ होय.
- प्रकर्ष पिंगे, अध्यक्ष, श्री गणेश सभा

मराठवाड्यातील पहिला ‘श्रीराम सेतू’
दोन मंदिरांत येण्या-जाण्यासाठी एक पूल (श्रीराम सेतू) तयार होण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. हा सेतू २५ फूट लांबीचा जरी असला, तरी तो भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अयोध्यामधील मंदिरात श्रीरामाच्या मूर्ती जानेवारीत स्थापन होण्याआधी आम्ही हा ‘श्रीरामसेतू’ येथे उभारला.
- नरेंद्र देव अध्यक्ष, श्रीराम मंदिर ट्रस्ट.

Web Title: Varad Ganesha, Shri Ram temple connected by 25 feet long bridge in Chhatrapati Sambhajinagar; Joy among devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.