वर्धन घोडे खून खटल्यात तांत्रिक व न्यायवैद्यक पुरावे जुळल्याने दोष सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:52 PM2018-12-11T18:52:06+5:302018-12-11T19:03:17+5:30

लाल रंगाच्या उघड्या स्पोर्टस् कारमधून आरोपींनी वर्धनला टिळकनगर येथून दौलताबादच्या घाटात नेले.

Vardhan Ghode murder case, accused proved guilty by matching technical and forensic evidence | वर्धन घोडे खून खटल्यात तांत्रिक व न्यायवैद्यक पुरावे जुळल्याने दोष सिद्ध

वर्धन घोडे खून खटल्यात तांत्रिक व न्यायवैद्यक पुरावे जुळल्याने दोष सिद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी तंत्रज्ञानाचा उचलला फायदा डीएनए, हस्ताक्षरतज्ज्ञांच्या अहवालाने आरोपींवर गुन्हा सिद्ध तंत्रज्ञानाचा पोलिसांनी उचलला फायदा 

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : खंडणी मागण्यासाठी वर्धन घोडेच्या घरी टाकलेली चिठ्ठी ही आरोपींनीच लिहिल्याचा अहवाल हस्ताक्षरतज्ज्ञांनी दिला. एवढेच नव्हे तर आरोपींनी खून करण्यासाठी वापरलेल्या रुमालावरील रक्ताचे डाग आणि वर्धनचे रक्त नमुने सारखेच असल्याचा न्याय सहायक वैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालाने  आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात पोलीस यशस्वी ठरले.  

२१ सीसीटीव्हींचे फुटेज ठरले महत्त्वाचा पुरावा

लाल रंगाच्या उघड्या स्पोर्टस् कारमधून आरोपींनी वर्धनला टिळकनगर येथून दौलताबादच्या घाटात नेले. तेथे त्याचा रुमालाने गळा आवळून खून केल्यानंतर त्याला कारच्या डिक्कीत टाकून परत श्रेयनगरमध्ये आणले आणि तेथील नाल्यात वर्धनचा मृतदेह त्यांनी फेकला होता. टिळकनगर येथून वर्धनला नेत असताना मार्गावरील सीसीटीव्हीत कारमध्ये वर्धन आणि आरोपी बसलेले दिसत होते, तर परत येण्याच्या आरोपींच्या प्रवासादरम्यान ते दोघेच कारमध्ये असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने चित्रित केले होते. या तांत्रिक पुराव्याद्वारे आरोपी वर्धनला कारमधून नेत असल्याचे आणि परत येताना त्यांच्यासोबत वर्धन नसल्याचे सिद्ध झाले.

खंडणीची मागणी करणाऱ्या चिठ्ठीवरून पकडले आरोपी
पाच कोटी रुपयांची खंडणी पुणे रस्त्यावरील स्माईल स्टोन ढाब्याजवळ आणून द्या,अशी चिठ्ठीच आरोपी अभिलाषने वर्धनच्या घरात टाक ली होती. त्यावेळी सोसायटीत राहणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत खडके, चंद्रकांत खंदारे, शांतीलाल बारवाल यांना अभिलाष आणि शाम मगरे यांच्यावर संशय आला. त्यांनी लगेच याबाबतची माहिती जवाहरनगर पोलिसांना कळविली. खडके यांनी अभिलाषकडे वर्धनविषयी विचारपूस करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. काही वेळात तेथे दाखल झालेल्या जवाहरनगर पोलिसांच्या मदतीने अभिलाष आणि शाम यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत वर्धनला दौलताबाद घाटात नेत रुमालाने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह श्रेयनगरमधील नाल्यात फेकल्याचे सांगितले. 

श्रेयनगर येथील नाल्यात फेकला मृतदेह
आरोपीने दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस त्याला सोबत घेऊन श्रेयनगर येथील नाल्याकडे गेले तेव्हा त्याने ज्या ठिकाणी वर्धनचा मृतदेह फेकला ती जागा दाखविली. तेथे नाल्यात निपचित पडलेल्या वर्धनचा मृतदेह पोलिसांच्या नजरेस पडला. पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, निरीक्षक मधुकर सावंत आणि गुन्हेशाखेच्या पोलिसांनी पंचनामा करून नाल्यातून मृतदेह बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल केला. तेथील डॉक्टरांनी वर्धनला तपासून मृत घोषित केले. 

एसआयटीने केला तपास
वर्धनच्या खुनाचा तपास जलदगतीने व्हावा,याकरिता तत्कालीन आयुक्त अमितेशकुमार यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक डी.बी. कोपनर, उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, कर्मचारी सुनील बडगुजर, विरेश बने आणि शेख नवाब यांचा या पथकात समावेश होता.

२७ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री असा घडला घटनाक्रम
- रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वर्धन गायब झाल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली.
- रात्री ११ वाजेच्या सुमारास वर्धनच्या घरात खंडणीची चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांना समजले.
- रात्री ११ वाजता- खंडणीच्या चिठ्ठीच्या आधारे संशयित आरोपी अभिलाष ऊर्फ अभिराज मोहनपूरकर आणि शाम मगरे यांना सहायक उपनिरीक्षक खडके आणि नागरिकांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांना मिळाली. 
- ११.३० ते ११.३५ दरम्यान निरीक्षक कल्याणकर, उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे आणि कर्मचाऱ्यांनी गिरीकुंज सोसायटीत जाऊन संशयितांना  ठाण्यात आणले. 
- ११.४० वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी ठाण्यात दाखल.
- ११.४० ते ११.५० आरोपींकडून घटनेची माहिती जाणून 
घेतली.
- १२.०५ वाजेच्या सुमारास आरोपींना सोबत घेऊन पोलीस अधिकारी वर्धनचा मृतदेह टाकलेल्या ठिकाणी पोहोचले. मृतदेहाचा शोध गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि अन्य कर्मचारी घेत होते.
- १२.२० वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला. घटनास्थळ पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
- १२.२५ वाजता मृतदेह सिग्मा रुग्णालयात पाठविला.
- १२.४० वाजता मृतदेह रुग्णालयात.
- १२.४५ वाजता डॉक्टरांनी वर्धनला तपासून मृत घोषित करून डेथ एमएलसी जवाहरनगर पोलीस ठाण्यास पाठविली.
- पहाटे ४.३० वाजता वर्धनच्या मृत्यूची एमएलसी जवाहरनगर ठाण्यात नोंद.
- सकाळी ७.३० वाजता आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा नोंद.
- दुसऱ्या दिवशी घाटी रुग्णालयात शवविच्छेदन.

Web Title: Vardhan Ghode murder case, accused proved guilty by matching technical and forensic evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.